बहुजननामा ऑनलाइन टीम : महाराष्ट्रात अखेर महाविकसआघाडीचे सरकार स्थापन होणार असून आज राज्याच्या २९ व्य मुख्यमंत्रीपदी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे शपथ घेणार आहेत. मात्र याआधी उद्धव ठाकरे सामना या शिवसेनेच्या मुखपत्राच्या संपादकाचा राजीनामा दिला आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे हे सामनाचे संपादक म्ह्णून कामकाज पाहत होते. मात्र कालपासून सामना वृत्तपत्रावरून उद्धव यांचे नाव हटविण्यात आले आहे.
गेली ७ वर्ष उद्धव ठाकरे सामनाचे संपादक होते. तर संजय राऊत हे कार्यकारी संपादक म्हणून काम पाहत होते. सामना हे शिवसेनेचे मुखपत्र आहे, सामनाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी अनेकांचा समाचार घेतला आहे, विरोधी पक्षसोबतच, भाजप पक्षावरही त्यांनी अनेकवेळा सडकून टीका केली आहे.
दरम्यान, महाविकासआघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री हा संपूर्ण राज्याचा नेता असतो. त्यामुळे आता संपादक म्हणून काम करणे योग्य नसल्याने त्यांनी सामनाची संपूर्ण जबाबदरी संजय राऊत यांच्यावर सोपविली आहे. त्यामुळे आजच्या सामना वृत्तपत्रातून उद्धव ठाकरे यांचे संपादक म्हणून नाव वगळण्यात आले आहे.
Visit : bahujannama.com