मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शिवेसनेत प्रवेश करणार असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. भुजबळ यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर शिवसेनेकडून अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ हे शिवसेनेत येणार नाहीत असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाची जोरदार चर्चा सुरु आहे. याला अखेर उद्धव ठाकरेंनी पूर्णविराम दिला आहे. नाशिक दिंडोरी येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत कार्यकर्त्यांकडून छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्या प्रवेशाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “भुजबळ कुटुंबियांकडून शिवसेनेशी कोणताही संपर्क झाला नाही.” असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांनतंर त्याला शिवसैनिकांनी जोरदार विरोध दर्शवला होता. विक्रोळीतील शिवसैनिक रवींद्र तिवारी यांनीही भुजबळांना विरोध दर्शवताना बॅनरबाजी केली. त्यांनी शिवसेना भवन, मातोश्री तसेच मुंबईच्या सर्व प्रमुख चौकात भुजबळांना विरोध दर्शवणारे बॅनर लावले. यावर भुजबळांचे कार्टून काढण्यात आले होते. त्यांना त्यात लखोबा लोखंडे असे संबोधण्यात आले होते. याशिवाय साहेबांना दिलेला त्रास जनता विसरू शकत नाही, आपण आहात तिथे रहा. असा संदेशही यातून देण्यात आला होता.
शिवसेना प्रवेशाचं छगन भुजबळांकडूनही खंडन
दरम्यान शिवेसना प्रवेशाबाबतच्या चर्चांवर बोलताना छगन भुजबळ यांनीही या वृत्ताचं खंडन केलं होतं. याबाबत बोलताना ते म्हणाले होते की, “मी शिवसेनेत प्रवेश करणार नाही. या बातम्या खोट्या आहेत. मी शिवसेनेत प्रवेश करण्याच्या बातम्यात तथ्य नाही. सचिन अहिर आणि माझा मूळचा मतदारसंघ भायखळाजवळ असल्याने या चर्चा सुरु झाल्या असाव्यात.” असा अंदाजही छगन भुजबळ यांनी व्यक्त केला होता.