बहुजननामा ऑनलाईन- राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी झालेल्या भेटीनंतर साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपला भाजप प्रवेश निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. साताऱ्यातील त्यांच्या समर्थकांकडून माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपची महाजनादेश यात्रा रविवारी (ता.१५) साताऱ्यात पोहचत आहे. याप्रंसगी भाजपच्या वरिष्ठांसोबत चर्चा करुन राजीनामा दिल्यानंतर ते महाजनादेश यात्रेत भाजपात प्रवेश करतील. गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भोसलेंच्या पक्षांतरावरुन राजकीय वर्तुळात खलबंत चालली होती.
त्यातच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्याबाबत कोणताही अंदाज बांधता येत नव्हता. राष्ट्रवादीतून खासदारपदी निवड झाल्यावर काही काळानंतर त्यांचा सुर पलटला. त्यांनी काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधामुळे त्यांचा पक्षप्रवेश रखडला. भाजप त्यांना खेळवत आहे. अशा बातम्या येत होत्या. मात्र यावर त्यांनी काहीच स्पष्टीकरण दिले नाही. त्यातच गुरुवारी (ता.११) त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्याची घोषणा केली.
त्यानुसार आज त्यांनी आमदार शशिकांत शिंदे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासोबत त्यांची भेट घेतली. त्या भेटीत काय झाले याबद्दल कोणतीही माहिती पुढे आली नाही. मात्र त्यानंतर त्याच्या राजकीय गोटात हालचाली सुरु झाल्या आणि राष्ट्रवादीत राहणार असे वाटत असतानाच पुन्हा भाजपप्रवेशाचा अंतिम निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली. उदयनराजे शनिवारी (ता.२१) दिल्लीत जाऊन आपल्या खासदारपदाचा राजीनामा देतील. त्यानंतर रविवारी भाजपच्या महाजनादेश यात्रेत ते सर्व नगरसेवक, जिल्हा पंचायत समिती सदस्यांसह भाजपमध्ये प्रवेश करतील असे त्यांच्य निकटवर्तीयांनी सांगितले आहे.