बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. त्याआधी त्यांनी दिल्लीत जाऊन त्यांच्या खासदारकीचा राजीनामाही दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे साताऱ्यात आता लोकसभा मतदार संघासाठी पोटनिवडणूका होणार आहेत. पण उदयनराजेंचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रश्न राष्ट्रवादीला पडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातऱ्याची जागा राष्ट्रवादीकडे असताना उदयनराजेंच्या विरोधात तितक्याच ताकदीचा उमेदवार म्हणून कॉंग्रेस पक्षश्रेष्ठीकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची वर्णी लागलेली आहे. आता उदयनराजेंच्या विरोधात चव्हाण निवडणूक लढविणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे चव्हाण ही निवडणूक लढविण्यास तयार असतील तर कॉंग्रेससाठी हा मतदारसंघ सोडण्याची तयारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने दर्शविली आहे.
याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसून राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा सुरु आहेत. उदयनराजेंच्या राजीनाम्यामुळे सातारा मतदारसंघात या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे या पोटनिवडणूका आणि विधानसभा निवडणूका बरोबरच होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र या निवडणूका कधी जाहीर होतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.