पुणे : बहुजननामा ऑनलाइन – लेखक जयभगवान गोयल यांनी लिहिलेले ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर देशातून आणि महाराष्ट्रातून त्याविरोधात निषेध व्यक्त केला जात आहे. अनेकजण सोशल मीडियावर आपली मते मांडत टीका करत आहेत. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज उदयनराजे भोसले काय मत मांडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले असताना आज पुण्यात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले मत मांडले आहे. महाराष्ट्राचा अस्मितेचा सर्वोच्च अभिमानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात आली आहे. त्यावर संताप व्यक्त करत महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नसल्याचे म्हटले. तसेच महाराजांशी तुलना करणेही अत्यंत चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कालच संजय राऊत यांनी शिवरायांचे वंशज असणाऱ्या कोल्हापूर आणि साताऱ्याच्या गादीच्या वारसदारांनी स्पष्ट भूमिका जाहीर करावी आणि भाजपतून राजीनामे देण्याची मागणी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देत उदयनराजे यांनी महाविकस आघाडीतील पक्षांवर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का ? असा प्रश्न अनेकदा पडतो असे सांगताना जे पुस्तक प्रकाशित झाले ते ऐकून अत्यंत वाईट वाटले. नरेंद्र मोदींची छत्रपती शिवरायांशी तुलना करणं अत्यंत चुकीचे आहे. महाराजांसोबत तुलना होईल इतकी जगात कोणाचीही उंची नाही. तसेच जाणता राजा फक्त छत्रपती शिवाजी महाराजचं असल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर राज्यात वाद निर्माण झाला असून हे पुस्तक मागे घेण्याची मागणी अनेक विरोधकांनी केली आहे. आणि अखेर या पुस्तकावरून सुरु झालेल्या वादावर भाजपने पडदा टाकत पुस्तकाचा भाजपशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले आहे. तसेच लेखकाने पुस्तक मागे घेऊन त्यांनी माफी पण मागितली असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या ट्विटमधून सांगितले आहे.