मुंब्राः बहुजननामा ऑनलाईन – लाचलुचपत प्रतिबंधित विभागाचे (ACB) अधिकारी असल्याची बतावणी करुन व्यापा-याकडे एक लाखांची खंडणी मागणा-या दोघा भामट्यांच्या मुंब्रा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे बृहन्मुंबई महापालिकेच्या स्वच्छता आणि आरोग्य विभागाचे तसेच नँशनल सिक्युरिटी आणि करप्शन क्राईम प्रिवेन्टिव्ह ब्रिगेडची ओळखपत्र आढळून आली असून पोलिसांनी ती जप्त केली आहेत.
अलमदर पुन्जा आणि जयेश सोनावणे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी मुबशीर शेख यांनी तक्रार दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्र्यातील कौसा भागातील सिमला पार्क परीसरातील मिनार रेसीडेन्सी मध्ये रहात असलेल्या मुबशीर शेख यांचे रशिद कम्पाउंड येथील हशमत चौकात सुपारी विक्रीचे दुकान आहे.
शनिवारी रात्री या दुकानात जाऊन अलमदर पुन्जा आणि जयेश सोनावणे यांनी ते नवी मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधित विभागातील अधिकारी असल्याचे शेख यांना सांगतिले. तसेच तुमच्या दुकानामध्ये गुटख्याची विक्री होत असल्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत असून,यातून वाचायचे असल्यास एक लाख रुपये द्या, अशी मागणी केली. याबाबत शेख यांनी दाखल केलेल्या तक्रारी वरुन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.