बहुजननामा ऑनलाईन टीम : व्यसनमुक्ती केंद्रातील दोन तरुणींनी ओढणीने गळा आवळून एका तरुणीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यसनमुक्ती केंद्रातून सुटका करून घेण्यासाठी एक तरुणीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. टिटवाळ्याजवळच्या रायते गावात दिशा सामाजिक सेवा संस्था व्यसनमुक्ती केंद्रात ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, किशोरी सावंत (वय-34) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे तर ईशा पांडे (वय-19), विशाखा कोटावे (वय-19) असे आरोपी तरूणींची नावे आहेत. दिशा सामाजिक सेवा संस्था व्यसनमुक्ती केंद्रात मागील काही दिवसांपासून किशोरीसह ईशा आणि विशाखा या तीघी उपचार घेत होत्या. किशोरीमुळे आपल्याला केंद्रातून डिस्चार्ज मिळत नसल्याचा गैरसमज ईशा आणि विशाखाला झाला होता. त्यामुळे दोघींनी केंद्रातून सुटका करुन घेण्यासाठी ईशा आणि विशाखाने तिला मारण्याचा कट रचला. त्यांनी किशोरीच्या जेवणामध्ये उवा मारण्याचे औषध टाकले. जेवण केल्यानंतर किशोरीला गुंगी आली. नंतर दोघींनी ओढणीच्या मदतीने किशोरीचा गळा आवळून तिची हत्या केली. आपला गुन्हा सगळ्यांसमोर येऊ नये म्हणून किशोरीने आत्महत्या केल्याचा दोघींनी बनाव केला. या प्रकरणी टिटवाळा पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.
ज्यावेळी किशोरीचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी कल्याण येथे राणी रुख्मिणीबा रुग्णालयात नेण्यात आला. किशोरीने आत्महत्या नाही तर तिची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये उघड झाले. पोलिसांनी तपास करुन किशोरीसोबत राहणाऱ्या ईशा आणि विशाखाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांना घाबरुन या दोघींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. ईशा आणि विशाखाला पोलिसांनी अटक केली आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Visit : bahujannama.com