मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या NIA ला या प्रकरणात सचिन वाझेबरोबर आणखी दोघा पोलीस निरीक्षकाचा सहभाग असल्याचा संशय आहे. वाझेच्या षडयंत्रात सहभागी होऊन या दोघांनी त्याला पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केल्याचे समजते. दोन्ही अधिकारी गुन्हे शाखेतील असून यापैकी एकाने वाझे मनसुखसमवेत प्रवास करताना त्याच्या गाडीला गायमुख ते ठाणे खाडीपर्यंत एस्कॉर्ट केल्याची माहिती NIA ला मिळाली आहे. या दोन अधिकाऱ्यांपैकी एकजण ठाण्यातील असून लवकरच त्याला चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वाझे आणि मनसुख ज्या गाडीत बसले होते, त्याच गाडीत मनसुख यांची हत्या झाली. त्या गाडीला रस्त्यात नाकाबंदीत कोणी अडवू नये म्हणून पोलीस निरीक्षक त्याच्या पुढे गाडीतून प्रवास करत होता. 4 मार्चला मनसुखची हत्या झाली त्या रात्री एका पोलीस निरीक्षकाला वाझेने सीआययूच्या ऑफिसमध्ये थांबायला सांगून आपला मोबाइल त्याच्याकडे दिला होता. कोणाचा फोन आल्यास वाझे बिझी असल्याचे सांग, असे वाझेंनी त्याला सांगितले होते. दरम्यान वाझेच्या तत्कालीन सहकाऱ्यांची एनआयएकडून चौकशी सुरू आहे. साहाय्यक निरीक्षक रियाज काझी व प्रशांत ओव्हाळ यांच्यासह चौघांची सोमवारी एनआयएने 5 तास चौकशी केली. वाझेकडून नष्ट केलेल्या वस्तू व अन्य वस्तूंबाबत त्यांच्याकडून माहिती घेतली जात आहे. स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणी तपास करणाऱ्या NIA ला वांद्रेतील मिठी नदीच्या पात्रातून मिळालेल्या महत्त्वपूर्ण पुराव्यांची आता फॉरेन्सिक लॅबकडून तपासणी होणार आहे. यातील बहुतांश डाटा खराब झाला असला तरी तज्ज्ञांद्वारे त्यातील माहिती जमविली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.