बहुजननामा ऑनलाईन – कोरोगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ करून त्याचे फोटो आई वडिलांना दाखवण्याची धमकी देत हजारो रुपयांची खंडणी उकळणाऱ्या दोन युवकांच्या मुसक्या कोरेगाव पोलिसांनी आवळल्या आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, विक्रम उत्तम क्षत्रिय आणि शुभम तानाजी फाळके या दोघांनी सातारारोड येथील एका अल्पवयीन मुलाला हेरून जबरदस्तीनं मोटारसायकलवर बसवून पाटखळ माथा येथील लॉजवर नेलं. लॉजवरील एका रूममध्ये घेऊन गेल्यानंतर जबरदस्तीनं माराहण करत त्याला विवस्त्र केलं. त्या रूममध्ये अगोदरच एक महिला होती. संबंधित महिला आणि त्या युवकांनी त्याचा लैंगिक छळ केला. त्यानंतर ते त्या अल्पवयीन मुलाला घेऊन परत सातारारोडला आले. त्याच दिवशी दुपारी पुन्हा त्या अल्पवयीन मुलाला बरोबर घेऊन पाटखळ माथा येथील लॉजवर गेले.
यावेळी विक्रम व शुभम फाळके यांनी सांगितलं की, तुझे फोटो आमच्याकडे आहेत. ते तुझ्या आईवडिलांना दाखवू अशी धमकी देत त्याला ब्लॅकमेल केलं. तू आम्हाला 17 हजार रुपये ताबडतोब आणून दे. त्यांनी दिलेल्या धमकीच्या भीतीनं घाबरलेल्या अल्पवयीन मुलानं घरातील कपाटात ठेवलेले 17 हजार रुपये शुभम फाळके याच्याकडे आणून दिले.
17 सप्टेंबर रोजी विक्रम क्षत्रिय यानं पुन्हा एकदा शुभम फाळके यांच्यामार्फत निरोप पाठवून मुलाला ब्लॅकमेल केलं आणि 13 हजारांची मागणी केली. यावेळी त्या अल्पवयीनं मुलानं घरातील कपाटातून 13 हजार रुपये विकम क्षत्रिय याला दिले. अखेर या त्रासाला कंटाळून या मुलानं सर्व प्रकार वडिलांना सांगितला. त्यांनी पोलिसात तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. सातारारोड पोलीस दूरक्षेत्राचे एपीआय संतोष साळुंखे या प्रकरणाचा अधिकत तपास करत आहेत.