यवतमाळ : बहुजननामा ऑनलाईन – मानसिक संतुलन बिघडलेल्या एका तरुणाने झोपेत असलेल्या भावकीतील दोघांची कु-हाडीचे घाव घालून हत्या केली. तर 5 जणांना गंभीर जखमी केेले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कारला देव (ता. पुसद) येथे रविवारी (दि. 18) मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. जखमींमध्ये तरुणाच्या आई आणि बहिणीचाही समावेश आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गोकुळ राठोड (वय 23 वर्ष) असे या आरोपी तरुणाचे नाव आहे. वसंत राठोड, नेरचंद आडे असे हल्ल्यात ठार झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळ हा कारला देव इथे आपल्या कुटुंबासोबत राहतो. रविवारी मध्यरात्री 3 च्या सुमारास गोकुळने घरातील धारदार कुऱ्हाड काढली. त्यानंतर घरात झोपलेले त्याच्या आत्याचे पती वसंता राठोड यांच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्याने आपली आई सुनिता राठोड हिच्यावर सुद्धा कुर्हाडीचे घाव घालून तिला जखमी केले. आईवर घाव घालताना त्याची बहीण अश्विनीला जाग आली. अश्विनीने गोकुळला रोखण्याचा प्रयत्न केला. पण यात अश्विनीसुद्धा गंभीर जखमी झाली. कुटुंबीयांना जखमी करुन गोकुळ हा शेजारी राहत असलेल्या भावकीतील नेरचंद आडे यांच्या घरी गेला. अंगणात झोपलेल्या नेरचंद आडे यांच्यावरही त्याने कु-हाडीने घाव घातले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच काका संजय राठोड यांना सुद्धा गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच पुसद ग्रामीण पोलीस घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. पुसद ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत.