नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोनाच्या दुसर्या लाटेने विध्वंस सुरू केला आहे. तर, हजारो रूग्णांचा मृत्यू होत आहे. भारतात कोरोनामुळे बिघडणारी स्थिती पाहून अमेरिकेने मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने 4 मेपासून भारतीयांच्या युएस प्रवासावर प्रतिबंध लावला आहे. व्हाईट हाऊसने शुक्रवारी एका वक्तव्यात ही माहिती दिली.
व्हाईट हाऊसच्या प्रवक्ता जेन साकी यांनी वक्तव्यात म्हटले, रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांच्या सल्ल्यानुसार प्रशासन भारतातून येणार्या प्रवाशांवर प्रतिबंध लावत आहे. भारतात कोविड 19 ची वाढती प्रकरणे आणि संसर्गाच्या अनेक व्हेरिएंटच्या प्रसारामुळे हा निर्णय घेण्यात आला.
अमेरिकेतून वैद्यकीय मदत भारतात पोहोचली
याच दरम्यान अमेरिकेतून कोरोनाशी लढण्यासाठी भारताला मदत साहित्य पाठवण्यात आले आहे. अमेरिकेतून पाठवण्यात आलेले शेकडो ऑक्सीजन सिलेंडर आणि रेग्युलेटरसह आपत्कालिन वैद्यकीय आणि मदत साहित्याचा पहिला साठा घेऊन दोन विमाने शुक्रवारी भारतात पोहोचली. अमेरिकन हवाई दलाच्या मोठ्या लढाऊ विमानांपैकी सी-5एम सुपर गॅलेक्सी विमान वैद्यकीय उपकरणे आणि इतर साहित्य घेऊन दिल्लीत पोहचले.