पुणे : बहुजननामा ऑनलाइन – मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अज्ञात वाहनाने टोयाटो क्वालिस गाडीला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरु असून हा अपघात लेन कटिंग करुन पुढे जाणाऱ्या वाहनामुळे झाला. हा अपघात आज पहाटे सहाच्या सुमारास किलोमीटर 16/500 जवळ झाला. राहुल दणाणे (वय-30) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तर त्याचा मित्र सिद्धेश पाटील हा जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी येथील राहुल आणि सिद्धेश हे टोयाटो क्वालिस गाडीतून पुण्याहून मुंबईकडे जात होते. एक्सप्रेस वेवर लेन कटिंग करुन पुढे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या अज्ञात वाहनाने डाव्या बाजूने जाणाऱ्या क्वालिस गाडीला धडक दिली. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असणारी कार पुढे जाणाऱ्या कंटेनरवर जाऊन आदळली. यामध्ये राहुलचा मृत्यू झाला तर सिद्धेश जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस आणि आयबी पेट्रोलिंग कर्मचारी अपघातग्रस्त ठिकाणी पोहचले. त्यांनी जखमी सिद्धेश पाटील याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध घेतला जात आहे.