लाहोर : वृत्तसंस्था – पंजाबमधून पळून पाकिस्तानमध्ये गेलेला खलिस्तानी नेता हॅपी पीएचडी उर्फ हरमीत सिंह याची लाहोरमधील एका गुरुद्वाराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीबाबतच्या पैशातून झालेल्या वादामुळे ही हत्या करण्यात आली असल्याचा दावा पोलीस करत असल्याची माहिती मिळत आहे.
हरमीत सिंह हा पंजाब पोलिसांच्या मोस्ट वांटेड लिस्टमधील एक महत्वाचा फरारी गुन्हेगार असून अमृतसरमध्ये हँड ग्रेनेड हल्ल्याचा कट रचणे आणि पंजाबमधील आरएसएस आणि शिवसेना नेत्यांच्या हत्येचा कट रचल्याचाही आरोप त्याच्यावर होता. तसेच पाकिस्तानमधून भारतात अंमली पदार्थांची तस्करी करणे आणि खलिस्तान समर्थक अतिरेक्यांचे स्लीपर सेल आणि टेरर मॉडेल तयार करण्याचा प्रयत्न तो करत होता.
अटक केल्यावर हरमीत सिंह स्वतःला खलिस्तान लिबरेशन फोर्सचा प्रमुख असल्याचे सांगत होता. तो आयएसआयच्या इशाऱ्यांवर काही वर्षांपासून पाकिस्तानमध्ये राहून तो पंजाबमधील नेटवर्कद्वारे अंमली पदार्थांची तस्करी करत होता. अतिरेक्यांचे टेरर मॉडेल आणि स्लीपर सेलची उभारणी करत होता. याच अंमली पदार्थाच्या तस्करीतील पैशांच्या देवाणघेवाणीवरुन स्थानिक टोळीने लाहोरमधील गुरुद्वाराबाहेर हरमीत सिंह याच्यावर गोळीबार करुन त्याची हत्या केली, असल्याचे सांगितले जात आहे.
Visit : bahujannama.com