मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आज राज्यातील महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार होत असून शिवसेनेचे १३ राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ आणि काँग्रेसचे १२ मंत्री शपथ घेणार आहेत. कोणत्या पक्षाकडून कुणाला मंत्रिपद मिळणार यावर सध्या जोरदार चर्चा सुरू असली तरी लवकरच ते स्पष्ट होणार आहे. सध्या सर्वात जास्त चर्चा सुरू आहे ती उपमुख्यमंत्री पदाची. राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्री पद असून यासाठी अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. मुंबई शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे १३ मंत्री शपथ घेणार असून यामध्ये १० कॅबिनेट तर तीन राज्य मंत्र्यांचा समावेश असेल. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून १३ मंत्री शपथ घेणार आहेत. यात १० कॅबिनेट तर, ३ राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. तसेच कॉंग्रेसचे १२ मंत्री शपथ घेणार असून यामध्ये १० कॅबिनेट, २ राज्यमंत्री आहेत. म्हणजेच आज एकुण ३८ मंत्री गोपीनियतेची शपथ घेतील. तसेच सध्या काही खाती रिक्त ठेवण्यात आली असल्याची माहिती आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री पद तसेच गृहमंत्री पदाबाबत निर्णय घेण्यात आला असल्याचे सुत्रांनी सांगितले. उपमुख्यमंपदासाठी राष्ट्रवादीतून अजित पवार यांच्यासह जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील आणि छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा होती. परंतु, भुजबळ, पाटील आणि वळसे-पाटील यांनीच अजित पवार यांचे नाव उपमुख्यमंत्री पदासाठी सुचवल्याने अजित पवारच राज्याचे उपमुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
त्यामुळे अजित पवार हे आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात. त्यांच्याकडे ग्राम विकास किंवा अर्थ खात्याची जबाबदारी असू शकते. मात्र, गृहमंत्री पदाबाबत अद्यापही सस्पेन्स काय असून हे मंत्रीपद कुणाला मिळणार हे मंत्रिमंडळ विस्तारानंतरच स्पष्ट होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात तरूण चेहऱ्यांना संधी मिळण्याचीही शक्यता आहे. कारण, नव्या मंत्रिमंडळात युवा आणि अनुभवी अशा दोन्ही नेत्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळामध्ये प्रादेशिक तसेच सामाजिक समतोल साधण्याचाही प्रयत्न केला जाईल, असे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते.