मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आज सराफ बाजारात सोन्याच्या दराने नवीन इतिहास रचत सोने प्रति तोळे ४५,५१० रु. वर पोहोचले आहे. सोन्यासह चांदीचाही दर वाढला आहे. जगात सध्या कोरोना व्हायरसची दहशत पसरली असून त्याचा परिणाम शेअर बाजारावर होत आहे. शेअर बाजारात होणाऱ्या या घसरणीमुळे खरेदी करणाऱ्यांनी सोने खरेदी करणाऱ्याकडे लक्ष वळवले आहे.
सोन्या-चांदीची ही वाढ ऐन लग्न सराईच्या काळात झाली असून मागणी तशीच राहिली तर सोन्याचा दर ४६ हजारावर जाऊ शकतो. शुक्रवारी सराफ बाजारात उघल्यानंतर ४४,५०० रु. दर होता. तर दुपारनंतर सोन्याचा भाव ४५ हजारवर गेला. दिल्लीच्या सराफ बाजारात सोन्याचा दर ९१० रु.नी प्रति तोळे असून चांदीचा दर ७०० रु. प्रतिकिलो वाढला आहे.
सोन्याचा दर गुरुवारी १०० रु.नी घसरला असून येस बँकेवर निर्बंध घातले गेल्यामुळे शेअर बाजारात ८०० पेक्षा जास्त अंकांनी खाली आला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष सोने खरेदीकडे असून त्यामुळेच सोन्याचा दर १० ग्राममागे ४५,५१० रुपये तर चांदीचा दरही प्रति किलोमागे ४८,१८० रुपयांवर स्थिरावला आहे. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही गुंतवणूकदारांचा कल सोने खरेदीकडे वळला आहे.