बहुजननामा ऑनलाईन टीम : भारत सरकारनं आता 59 चायनीज अॅप्सवर बंदी घातली आहे. यात टिकटॉक, हेलो आणि युसी ब्राऊजर यांचाही समावेश आहे. आयटी अॅक्ट 69 ए अंतर्गत सरकारनं हे पाऊल टाकलं आहे. टीएमसी खासदार आणि बंगाली अॅक्ट्रेस नुसरत जहाँ यांनी यावर अशी काही प्रतिक्रिया दिली आहे की, त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. नुसरत अलीकडेच कोलकात्यातील इस्कॉनकडून आयोजित कार्यक्रमात पोहोचल्या होत्या. इथं त्यांनी टिकटॉक बॅनवर त्यांची प्रतिक्रिया दिली.
सरकारनं टिकटॉक बॅनचा निर्णय घाईत घेतला असं सांगत नुसरत जहाँ म्हणाल्या, “टिकटॉक माझ्यासाठी इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्रमाणे आहे. अचानक हा निर्णय घेतल्यानं काय होणार आहे. फक्त अॅप बंद केल्यानं काय होणार आहे.” नुसरत यांनी या निर्णयाची तुलना नोटबंदीसोबत केली. इतकंच नाही तर यामुळं अनेकांची नोकरी जाईल असंही त्या म्हणाल्या.
नुसरत पुढं म्हणाल्या, “देशहितासाठी आणि सुरक्षेसाठी मी सरकारच्या सोबत आहे. परंतु सैन्यासाठी वापरले जाणारे बुलेट प्रुफ जॅकेट चीनवरून येतात. झोपेतून उठून नोटबंदी झाली. अचानक अॅप बंद करण्यात आलं. यामुळं काय होणार आहे. याचं उत्तर कोण देईल. आम्हाला आता इन्फ्लेक्शन नको आहे.”
नुसरत जहाँदेखील मोठ्या प्रमाणात टिकटॉकवर सक्रिय होत्या. त्या अनेकदा त्यांचे व्हिडीओ टिकटॉकवर शेअर करत होत्या. त्यांचे लाखो फॉलोवर्सही होते.