नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जूनमध्ये भारताने 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली, ज्यात टिकटॉक (Tiktok) या लघु व्हिडिओ अॅपचा देखील समावेश होता. त्यानंतर जुलैच्या अखेरीस देखील आणखी 15 चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली. भारतातील बंदीनंतर अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालण्याची मागणी होत होती. अमेरिकेने चीनशी संबंध तोडण्यासाठी टिकटॉक समोर अट ठेवली आहे. या दरम्यान अशी बातमी येत आहे की टिकटॉकच्या भारतीय व्यवसायास रिलायन्स इंडस्ट्रीज खरेदी करू शकेल.
ईटीच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की रिलायन्स इंडस्ट्रीज टिकटॉकची मूळ कंपनी बाइटडांस समवेत भारतीय व्यवसायात भाग घेण्याचा विचार करीत आहे. सध्या चर्चा सुरुवातीच्या टप्प्यावर असल्याची बातमी आहे. टिकटॉकचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन मेयर यांनी रिलायन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. या बैठकीत टिकटॉकच्या भारतीय व्यवसायाबद्दल चर्चा झाली आहे, तथापि रिलायन्स इंडस्ट्रीजने अद्याप याबाबत अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.
भारतात बंदी घातल्यानंतर टिकटॉक अस्वस्थ आहे कारण अमेरिकेतही टिकटॉकला आपला व्यवसाय गुंडाळावा लागू शकतो. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकला 15 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर अमेरिकेमध्ये टिकटॉक बंद केले जाऊ शकते. अमेरिकन व्यवसाय विक्रीसाठी टिकटॉक मायक्रोसॉफ्ट आणि ट्विटरसह अनेक कंपन्यांशी चर्चा करीत आहे. मायक्रोसॉफ्टला टिकटॉक विकत घेण्याचे प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जाऊ शकते.