पुणे : बहुजननामा ऑनलाईन – महानिबंधकांना सांगून तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी १ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या विशेष निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यासह तिघांविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ लिपिक अशोक देवराम गिते (वय ३६), सेवानिवृत्त सहायक निबंधक नंदकिशोर रामचंद्र झीने (वय ५९) आणि सेवानिवृत्त विभागीय सह निबंधक सतीश क्षीरसागर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हे तिघेही सहकारी संस्था येथे कार्यरत आहेत. नंदकिशोर झीने हे सेवानिवृत्त झाल्यानंतर कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत.
तक्रारदार हे जालना येथील राहणारे असून ते व त्यांचे अन्य दोन यांचे जमिनीसबंधाने उपनिबंधक /सावकरांचे निबंधक जालना तसेच विभागीय निबंधक सहकारी संस्था औरंगाबाद यांनी तक्रारदार यांच्या प्रकरणांचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने दिला होता.त्या निकालाविरुद्ध पुनर्निरिक्षणाचे (रिव्हिजन) अर्ज विरोधी पक्षकाराने पुण्यातील सावकाराचे महानिबंधक व विशेष निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे केला होता़ त्यातील तीन रिव्हिजनपैकी दोन रिव्हिजनचे निकाल तक्रारदार यांच्याविरुद्ध गेले होते़ तिसऱ्या रिव्हिजनचा निकाल महानिबंधक यांनी दिलेला नव्हता़.
या तिघांनी संगनमत करुन तक्रारदार यांना उर्वरित निकाल महानिबंधक यांना सांगून तक्रारदार यांच्या बाजूने करुन देतो, असे सांगून त्यासाठी १ लाख रुपयांची लाचेची मागणी केली़ तक्रारदार यांनी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याची पडताळणी ९ जानेवारी रोजी सर्वप्रथम केली. त्यानंतर १४ व १७ जानेवारी रोजी पडताळणी केली गेली. या तीनही पडताळणीत त्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. परंतु, प्रत्यक्ष सापळा कारवाई होऊ शकली नाही. पडताळणी करताना त्यांनी लाच मागितल्याचे ऑडिओ रेकॉर्डिग करण्यात आले आहे. त्यात लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाल्याने तिघांविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Visit : bahujannama.com