पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे-सासवड रोडवरील झेंडेवाडी येथील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्यासाठी जमलेल्या टोळीतील ३ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दरोड्याचे साहित्य, घातक शस्त्रे जप्त केले.
अहमदनगर जिल्ह्यातील ते सराईत गुन्हेगार आहेत.
उरुळीदेवाची ते सासवड या संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत होते. या पथकास दिवेघाटात २८ जूनला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असताना माहिती मिळाली की, दिवेघाटाच्या वरील हॉटेल व्ही.के.च्या पाठीमागे आडोशाला काही लोक बसलेले असून, त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटत आहेत, अशी बातमी मिळताच खात्री करण्यासाठी हे पथक तेथे गेले. तेव्हा तेथे ५ ते ६ जण संशयास्पदरित्या वावरताना दिसत होते. पोलीस आल्याची चाहूल लागताच ते पळून जाऊ लागले. त्यातील तिघे जण पोलिसांच्या हाती लागले.
किरण रावसाहेब काळे (वय ३०, रा. जामखेड, मिलिंदनगर ता. जामखेड, जि. नगर), सचिन रावसाहेब पवार (वय २३, रा. जामखेड, इंदूमती हॉस्पिटलसमोर, ता. जामखेड, जि. नगर), सचिन चंद्रकांत पवार (वय २१, रा. डोणगाव, ता. जामखेड, जि. नगर) अशी त्यांची नावे आहेत. इतर तिघे जण अंधाराचा व डोंगर चढ-उताराचा फायदा घेऊन पळून गेले. ताब्यात घेतलेल्या तिघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे मिरची पूड, दोन लोखंडी कटर, एक स्क्रूड्रायव्हर, एक चाकू असे साहित्य मिळून आले.
त्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी झेंडेवाडी येथील पेट्रोलपंपाची जमा झालेली रक्कम दरोडा टाकून लूटण्यासाठी येथे जमल्याचे सांगितले.आरोपींपैकी दोघे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, किरण काळे याच्यावर पुणे व अहमदनगर जिल्ह्यात यापूर्वी दरोडा, दरोडा तयारी व चोरी असे ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. सचिन पवार याच्यावरही अहमदनगर जिल्ह्यात जामखेड पोलीस स्टेशनला दरोडा, दरोडा तयारी व जबरी चोरी असे ३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. ते दोघे सध्या जामिनावर सुटलेले आहेत.