मॉस्को : वृत्तसंस्था – मॉस्कोच्या कुर्चतोव्ह इन्स्टीट्यूटच्या शास्त्रज्ञांनी आश्चर्यकारक असा प्रयोग केला आहे. संशोधकांनी थ्री-डी प्रिंटिंगद्वारे स्वर प्रणाली विकसित करून तीन हजार वर्ष जुन्या इजिप्तच्या ममीला आवाज दिला आहे. या नवीन प्रयोगामुळे प्राचीन मनुष्याचा आवाज ऐकण्यास मदत होऊ शकते. इजिप्तचे पिरामिड आणि ममी हे नेहमीच जगासाठी आश्चर्य आहे. या संशोधनाने जगाला आश्चर्यचकित केले आहे. संशोधनात सहभागी लंडन यूनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, इजिप्तची नेसयामुन ही ममी 1099 ते 1069 इ.स. पूर्वच्या दरम्यान फेराओ रामसेस द्वितीय यांच्या अस्थिर राजकीय सत्ताकाळात केली गेली आहे.
सायन्टिफिक रिपोर्ट जरनलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार नेसयामुन हे इजिप्तचे जागतिक वारसा असलेले स्थळ थेब्सच्या मंदिरात पुरोहित आणि मुन्शी म्हणून काम करत होते. या मंदिराचे अवशेष इजिप्तमधील आधुनिक शहर लक्सर मध्ये आढळतात. नेसयामुन करत असलेल्या पूजाविधीत त्यांच्या आवाजाला विशेष महत्व होते. शास्त्रज्ञांनी नेसयामुनचा चेहरा आणि गळ्याचे सखोल विश्लेषण करण्यासाठी कम्प्यूटेड टोमोग्राफी स्कॅन नावाच्या एक्सरे डिव्हाईसचा वापर केला. यानंतर थ्री-डी प्रिंटिंगचा वापर करून ममीचा व्हॉईस बॉक्स म्हणजे स्वरयंत्र पुन्हा तयार केले. संशोधनात म्हटले आहे की, जेव्हा संशोधनकांनी थ्री-डी प्रिंटेड सेटअपचा वापर आर्टिफिशियल स्वरयंत्रासोबत केला (हा प्रयोग सर्वसाधारणपणे स्पीच सिंथेसिसमध्ये केला जातो) तेव्हा ते एक ध्वनी पुन्हा एकू शकत होते.