पुणे : बहुजननामा ऑनलाइन – लॉकडाऊन काळात पुण्यातील कोंढवा भागात हुक्क्याची ऑनलाईन ऑर्डर घेऊन त्याची “होम डिलीव्हरी” करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणत तिघांना पकडले आहे. त्यांच्याकडून 6 हुक्का भांडी, 6 तंबाखूजन्य फ्लेवर पाकीट , 4 मोबाईल, 2 दुचाकी असा 1 लाखाचा ऐवज जप्त केला आहे.
मित विजय ओसवाल (वय १९ रा. वानवडी बाजार), रॉयल जयराम मधुरम (वय २८ रा. लुल्लानगर, कोंढवा), परमेश महेश ठक्कर (वय २४ रा. भवानी पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात गेल्या 50 दिवसापासून संचारबंदी आहे. त्यामुळे सर्व आस्थापना बंद आहेत. मात्र, तरीही जादा पैसे कमविण्याच्या हेतूने अनेकजण तंबाखूजन्य पदार्थांची चढ्या दराने विक्री करत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान तिघेजण व्हॉट्स हॉट या वेबसाईटवर हुक्कयाची जाहिरात देउन घरपोच हुक्का विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांना मिळाली.
यानुसार पोलिस पथकाने संबंधित वेबसाईटवरील मोबाईल क्रमांकाचे लोकेशन काढले. त्यानुसार त्यांच्याकडे ऑनलाईनरित्या हुक्क्याची मागणी करीत बनावट ग्राहक पाठविला. त्यानंतर पोलिसांनी कोंढव्यातील लुल्लानगर परिसरातील धर्मादास लुल्लागार्डन येथे सापळा रचून मित, रॉयल, परमेशला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी व्हॉट्स हॉट वेबसाईटवर ऑनलाईन हुक्क्याची ऑर्डर घेउन ‘होम डिलीव्हरी’ करीत असल्याची कबुली दिली. तिघेही जण काहीही कामधंदा करीत नसून, महाविदयालयीन तरुणांना अंमली पदार्थांची विक्री करण्याचे काम करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक नीलेशकुमार महाडिक, संजय गायकवाड, संदीप साबळे, अमोल पिलाणे, मगर, गुरव, चौधर यांच्या पथकाने केली.