नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाची राजधानी दिल्लीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सणासुदीच्या हंगामात दहशतवादी दिल्लीत हल्ल्याचा कट रचत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जैशचे तीन ते चार आत्मघाती दहशतवादी सध्या दिल्लीत आहेत. त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रे असल्याचे सांगितले जात आहे. गुप्तचर यंत्रणेकडून सूचना मिळाल्यांनतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अनेक ठिकाणी छापा टाकले असून शोध मोहीम सुरू आहे.
दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेमुळे पोलिसांनी राजधानीमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा वाढविण्यात आली आहे. विशेषत: बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि मेट्रो स्थानकांवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, त्याच दिवशी, बुधवारी पंजाबमध्ये पोलिसांनी एका दहशतवाद्यास अटक केली आहे. जो मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होता. यापूर्वी एसआयटीने अमृतसर येथून तीन बदमाशांना अटक केली आणि त्यांच्याकडून पाच एके ४७ , दोन रायफल आणि दारूगोळा जप्त केला होता.
पाकिस्तानच्या वतीने दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण हे यशस्वी होत नाही हे पाहून आता पाकिस्तानकडून ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रे पाठविली जात आहेत. अलीकडेच पंजाबमधून चार दहशतवाद्यांना अटक करण्याव्यतिरिक्त एसआयटीला ४ ड्रोन विमानेही मिळाली होती, त्यातील तीन पूर्णपणे नष्ट झाली होती. हे ड्रोन चीन निर्मितीचे असल्याचे समजले आहे.
Visit : bahujannama.com