पानीपत : बहुजननामा ऑनलाईन – हरियाणा सरकारने देशातील पहिल्यांदाच एका युवकाला नास्तिक घोषित केले असून त्याला कोणतीही जात ,धर्म आणि देव नसल्याचे प्रमाणपत्रच जारी केले आहे. यावर सिरियल नंबरही देण्यात आला असून यासाठी या युवकाला तब्बल दोन वर्ष कायदेशीर लढा द्यावा लागला आहे.
रवीने आपल्या नावात बदल करण्यासाठी २०१७ मध्ये फतेहाबाद न्यायालयात दिवाणी खटला दाखल केला होता. त्याला यंदाच्या जानेवारीमध्ये नावासोबत नास्तिक लिहिण्याची अनुमती देण्यात आली. आता उप जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसील कार्यालयाने रवी नास्तिकला ‘नो कास्ट, नो रिलीजन आणि नो गॉड’ असे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
रवी यांनी अर्ज केल्यानंतर त्यांची प्रशासनाने सर्व कागदपत्रे तपासून तो गुन्हेगार तर नाही याचीही चौकशी केली गेली. तसेच अन्य देशांशी काही संबंध आहेत का याचीही चौकशी केली गेली. तसेच रवी हा या प्रमाणपत्राचा वापर अन्य कोणत्या कारणांसाठी करणार नाही, याबाबतही खात्री करण्यात आली. एवढ्या चौकशीनंतर त्यांनी उप तहसीलदारांना आदेश देत २९ एप्रिलला नास्तिक असल्याचे प्रमाणपत्र दिले.
देशात अशा प्रकारचे पहिलेच प्रकरण असून स्वयंघोषितच्या आधारे त्याला हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.