नागपूर : बहुजननामा ऑनलाइन- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप-शिवसेनेची वाट धरली होती. अनेक दिग्गज नेते असल्याने राष्ट्रवादीला मोठे धक्के बसले होते. परंतु आता भाजपमधूनच आऊंटगोईंग होताना दिसत आहे. नागपूरमधील भाजपचे माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत. नागपूर जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार विजय घोडमारेही राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतल्याचेही समजत आहे.
विजय घोडमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते माजी मंत्री रमेश बंग यांची भेट घेतली. दरम्यान भेटीचा विषय अद्याप समोर आलेला नाही. परंतु आगामी निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवण्यासाठीच ही भेट असल्याचे सूत्रांकडून समजत आहे.
विजय घोडमारे 2009 च्या निवडणुकीत भाजपकडून विजयी झाले होते. विधानपरिषदेचे आश्वासन देत त्यांना 2014 च्या निवडणुकीत थांबवण्यासाठी सांगण्यात आले. ज्येष्ठांनी दिलेला शब्द पाळला नसावा आणि यंदाच्या निवडणूकीत पक्षाकडून तिकीट मिळण्याची कुठलीही शक्यता नाही. त्यामुळे घोडमारेंनी हे पाऊल उचलले असावे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रत धक्का बसण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक आबा साळुंखे यांनी राजीनामा दिला आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.