नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बजेटमध्ये इनकम टॅक्सशी निगडीत घोषणा आजपासून लागू होतात. आर्थिक वर्ष 2019-20चं पूर्ण बजेट या वर्षी लोकसभा निवडणुकीनंतर जुलैमध्ये सादर करण्यात आलं होतं. म्हणूनच अनेक टॅक्स बदल आजपासून लागू होतील. हे काही टॅक्समधील प्रमुख बदल आहेत जे रविवारपासून लागू होणार आहेत.
– आजपासून जर तुम्ही एखादी प्रॉपर्टी खरेदी करत असाल तर टीडीएस कपातीसाठी तु्म्हाला थोडं अधिक गणित करावं लागेल. तु्म्हाला क्लब मेंबरशिप फीस, कार पार्किंग फीस, वीज बिल यांसारखे इतर खर्चही लक्षात घ्यावे लागतील. आधी खरेदीदार प्रॉपर्टीसाठी केलेल्या पेमेंटमधूनच टॅक्स कापत होते. याशिवाय टीडीएसच्या रकमेचे मोजमाप करताना, क्लब मेंबरशिप फीस इत्यादी इतर खर्चांना एकूण रकमेमधून कमी करावं लागत होतं.
– बँक, सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील खात्यातून एका वर्षात 1 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढल्यास सप्टेंबरपासून टीडीएस आकारला जाईल. लोक मोठ्या प्रमाणात रोख व्यवहार करू नये या उद्देशाने हे पाऊल उचलले गेले आहे.
– व्यावसायिकांच्या आणि कंत्राटदारांच्या वार्षिक 50 लाखांहून अधिक दिलेल्या देयकावर 5 टक्क्याच्या दराने टीडीएस कापला जाईल. याचा अर्थ असा की, जर कोणी घराची दुरुस्ती, लग्न, किंवा इतर कामासाठी व्यावसायिकाला या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम अदा करत असेल तर त्याला टॅक्स भरावा लागेल.
– लाईफ इंश्योरस पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर मिळणारी रक्कम जर टॅक्सेबल असेल तर, एकूण इनकमवर 5 टक्के दराने टीडीएस वजा केला जाईल. एकूण इनकम कॅल्क्युलेट करण्यासाठी प्राप्त झालेल्या रकमेमधून दिल्या गेलेला इश्युरंस प्रीमीयम वजा केला जातो.
– सध्या बँका व अन्य वित्तीय संस्थांना काही प्रमाणात केलेल्या व्यवहारांची माहिती द्यावी लागत होती. ही मर्यादा 50000 रुपये किंवा अधिक होती. पण आता सरकारने आपली व्याप्ती वाढवली आहे. आजपासून बँकांना यापेक्षा कमी किंमतीच्या व्यवहाराची माहितीदेखील द्यावी लागू शकते.
– जुलैमध्ये सादर केलेलं बजेट 2019 च्या आधीच्या नियमांनुसार, एका निश्चित कालावधीत आधारला लिंक न केलेले पॅन अवैध होऊन जातं.
– बजेट 2019 मध्ये आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली. ती म्हणजे आधार आणि पॅनची आपापसात अदलाबदली. पॅनऐवजी आधार केवळ काही विशिष्ट व्यवहारासाठी वापरलं जाऊ शकतं.