पुणे : बहुजननामा ऑनलाईन – सध्यची परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रंगभूमीवर नाटक यायला पाहिजे होते. मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदी आणि गोहत्याबंदी वरच्या निर्णयावर नाटक येऊ शकले असते. पण आणलं तर ते करणार कोण? आणि आणलं तरी चालू देतील का? याची शाश्वती काय? सध्या गढूळ वातावरण तयार झाले आहे. जे रंगभूमी आणि लोकशाहीसाठी चांगले नाही, याचा निषेध करायला हवा, अशा शब्दात ज्येष्ठ नाट्य अभ्यासक माधव वझे यांनी रंगभूमीवरील संपुष्टात आलेल्या राजकीय नाट्यावर भाष्य केले.
स्वातंत्र्यपूर्वकाळात रंगभूमीवर आलेल्या राजकीय नाटकांवर वझे यांनी प्रकाश टाकला. स्वातंत्र्यपूर्वकाळात नाटक एकाच वेळी अनेक प्रेक्षकांना चेतवते याची जाणीव नाटककारांना होती. सुरूवातीच्या काळात नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांची किचकवध आणि भाऊबंदकी ही नाटके गाजली.
कालपरत्वे आधुनिक मराठी रंगभूमीवर राजकीय नाटक मागे पडले. खासगी सेन्सॉर बोर्ड स्थापन झाले. नथुराम गोडसे बोलतोय हे गांधीच्या तत्वाज्ञानाशी चिरफाड करणारे नाटक सेना आणि कॉंग्रेसने चालू दिले नाही. म्हणून राजकारणावर नाटक लिहायला नाटककार घाबरत आहेत. नाटक लिहिले तरी ते रंगमंचावर येणार नाही आले तरी लोक ते बंद पाडतील. पूर्वीच्या काळात लोक विरोध करीत होते खळखट्याक सारख वातावरण नव्हते.मात्र, सध्या परिस्थिती बदलली असल्याची खंत वझे यांनी व्यक्त केली .