नागपूर: बहुजननामा ऑनलाईन – उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश अतुल चांदूरकर आणि नितीन सुर्यवंशी यांनी विधवा सुनेच्या सांभाळाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. पत्नीचा पतीच्या संपत्तीमध्ये हक्क असतो. त्यामुळे मुलाची संपत्ती मुलाच्या आई-वडिलांनी घेतली असेल, तर विधवा सुनेचा सांभाळ करण्याची जबाबदारी देखील सासू-सासऱ्यांवर येते, असा निर्णय दिला आहे .
या खटल्यातील दाम्पत्य मेघा आणि अमोल यांचा विवाह ३ मे २००७ रोजी झाला होता. वर्षांनंतर २१ फेब्रुवारी २००८ रोजी एका अपघातात अमोलचे निधन झाले. अपघतानंतर मुलाच्या विम्याचे ४२ लाख ९८ हजार रुपये, ग्रॅच्युईटी आणि इतर काही लाभ मुलाच्या आई-वडिलांनी मिळवले. मात्र, विधवा सुनेचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांनी नाकारली होती.
दरम्यान, पोटगी मिळण्यासाठी सुनेने उच्च न्यायालयात धाव घेतली. सुनेने १० रुपये महिना मिळावा अशी मागणी केली. न्यायालयाने सर्व पुरावे तपासून ७ हजार ५०० रुपये महिना पोटगी मंजूर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला. सासू-सासऱ्यांकडे मुलाची सर्व संपत्ती आहे. सून स्वतःचा सांभाळ करू शकत नाही, हे कोर्टात सिद्ध केले. त्यामुळे हिंदू वारसाहक्क कायद्यानुसार विधवा सुनेचा सांभाळ करण्याची जबाबदारी सासऱ्याची आहे, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.