संत श्री सेवालाल महाराज जयंतीनिमित्त पाथर्डीत तीन दिवसीय ‘बंजारा फेस्टिव्हल’

अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – बंजारा समाजाचे आराध्य दैवत सद्गुरू संत श्री सेवालाल महाराज यांच्या २८० व्या जयंतीनिमित्त पाथर्डी येथे पंधरा, १६ व १७ फेब्रुवारी २०१९ रोजी तीन दिवसीय बंजारा फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. बंजारा लोकगीते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्य स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक विष्णुपंत पवार यांनी दिली.
शुक्रवार १५रोजी सकाळी गंगाजल अभिषेक व महापूजा होऊन बंजारा फेस्टिवल या कार्यक्रमाची सुरुवात होईल. सायंकाळी सहा वाजता संत श्री सेवालाल महाराज जन्मोत्सव सोहळा आयोजन करून नंतर बंजारा भजनाचा कार्यक्रम होईल. शनिवार दि. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता बंजारा फेस्ट २०१९ या कार्यक्रमाचे उद्घाटन रामराव महाराज भाटेगावकर प्रबोधनकार नांदेड यांच्या हस्ते व बी. एस. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होईल.
यावेळी तहसीलदार विकास पवार,ज्येष्ठ नेते सुभाष मामा घोडके, उद्योजक बाजीराव राठोड आदी उपस्थित राहणार आहेत. रात्री आठ वाजता साहेबराव महाराज वाघळूजकर यांच्या भजनाचा कार्यक्रम होईल. रविवार (दि.१७) फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता सद्गुरु संत श्री सेवालाल महाराज पालखी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पालखी शोभायात्रेमध्ये विजापूर कर्नाटक, तेलंगाना,अकोला,वाशिम या ठिकाणाहून येणारे विविध बंजारा लेंगी पथक सहभागी होणार आहेत.दुपारी १ वाजता या कार्यक्रमाचा समारोप आणि पुरस्कार वितरण सोहळा माजी मंत्री अमरसिंह तीलावत यांच्याहस्ते व आमदार मोनिकाताई राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ.शिवाजी राठोड यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमात वसंतराव नाईक वाचन मंदिर यांच्यावतीने सामाजिक, शेती, उद्योग क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला जाणार आहे.
त्यामध्ये वसंतराव नाईक समाज भूषण, सुधाकरराव नाईक पर्यावरण जागृती, सेवा उद्योगरत्न या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास डॉ.मृत्युंजय गर्जे, अनिल राठोड, पैठणचे पोलिस उपअधीक्षक स्वप्नील राठोड,कृष्णा राठोड, संभाजी वडते, राहुल राठोड, पाथर्डीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप राठोड हे आणि पाथर्डी शेवगाव तालुक्यातील बंजारा समाज बांधव उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते पवार यांनी दिली.
Comments are closed.