शिवछत्रपतींचे व्यवस्थापन चिंतन आणि अनुकरणाचा विषय : डॉ. टेकाडे
March 10, 2019
यवतमाळ : बहुजननामा ऑनलाईन – सुलतान या चार अक्षरातील दहशत थरकाप उडवणाऱ्या भयानकपणे दाखवून देणाऱ्या मोहम्मद बिन कासिमच्या इ. स. ७११ मधील आक्रमणापासून सलग अकराशे वर्षे, आत्मसन्मान आणि विजिगीषू वृत्ती गमावून बसलेल्या सर्वसामान्य माणसांमध्ये कष्टाळू बाणा, लढण्याची मानसिकता, विजयाचा निर्धार, स्वराज्य ध्येयनिश्चिती अशा गुणांची रुजवण करीत, मराठी सैन्य मारत आहे आणि सुलतानी सैन्य पळत आहे, असा थक्क करणारा अनुभव हजारो वर्षांनंतर महाराष्ट्राच्या भूमीला प्रथमच देणारे शिवछत्रपतींचे व्यवस्थापन चिंतन आणि अनुकरणाचा विषय आहे] असे प्रतिपादन डॉ. सुमंत टेकाडे यांनी केले.
शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयात विद्यावाचस्पती प्राचार्य राम शेवाळकर स्मृती व्याख्यानाच्या व्यासपीठावरून ‘शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य’ या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष रमेश अणे अध्यक्षस्थानी होते तथा सहसचिव अशोक सोनटक्के व प्राचार्य डॉ. अरुंधती निनावे उपस्थित होत्या.
पाहुण्यांचा परिचय आणि प्रास्ताविक करताना डॉ. निनावे यांनी शिवरायांचे व्यवस्थापन म्हणजे स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी असलेली रचना होती हे विषद केले. शिवरायांच्या आगमनापूर्वी जवळजवळ एक हजार वर्षाचा इतिहास वेगवेगळ्या पैलूंनी उलगडवत अनेकानेक बाबतीत विश्वाला थक्क करणारी भारतीय बुद्धिमत्ता आणि कलात्मकता परकीय आक्रमणांनी कशी नष्ट झाली? हे स्पष्ट केले. या सगळ्यावर उपाय म्हणून, एका आईच्या चिंतनातून स्वराज्याची बिजे रोवली गेली, हे सांगत आजच्या काळात ९० टक्के मुले नव्हे तर पालकच बिघडले आहेत यांच्यावरही डॉ. टेकाडे यांनी अत्यंत मर्मग्राही निरूपण केले.
‘अयशस्वी लोकांना काही करायचे नसले की यशस्वी लोकांवर मारलेला शिक्का म्हणजे दैवी आशीर्वाद ‘,असे म्हणत महाराजांनी फक्त योग्यतेच्या भरवशावर गुणवंतांना कसे जवळ केले ते सांगून, आपल्या स्वार्थाकरता त्यांच्या अयोग्यतेला मांडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे थेट शिवप्रभूंचाच अपमान आहे. जगाने दखल घेतलेला अफजल खान वध, अद्वितीय नियोजनाने आग्य्रातून करून घेतलेली सुटका हे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्यानंतर जवळजवळ तीन वर्ष कुठलीही मोठी मोहीम न करता स्वराज्याचा पाया मजबूत करणारे, नवीन राजधानी उभारणारे, स्वत:चे आरमार आणि दारुगोळा संग्रह उभारणारे, ठराविक दिनी जनतेला पगार देणारे आणि रघुनाथपंत यांच्याद्वारे सुमारे चौदाशे शब्दांचा राज्यव्यवहार कोश निर्माण करणारे शिवछत्रपती आजच्या चिंतनाचा खरा विषय असायला हवेत, असे व्याख्यानात डॉ. सुमंत टेकाडे यांनी अधोरेखित केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या गतवर्षी पदवी प्राप्त करणाऱ्या २१ विद्यार्थ्यांचा प्रतीकात्मक पदवीदान समारंभ घेण्यात आला. अध्यक्षीय समारोपात रमेश अणे यांनी शत्रुंनीही गुणगान करावे आणि त्यांच्या ्त्रिरयांनीही महाराजांच्या सैन्याच्या चारित्र्याचे प्रमाणपत्र द्यावे, ही महाराजांची योग्यता प्रतिपादित केली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अभिजित अणे यांनी तर आभार अशोक सोनटक्के यांनी मानले.
Comments are closed.