नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राम मंदिर जन्मभूमीचा वाद गेल्या काही वर्षांपासून सुरू होता. मात्र, आता हा वाद संपुष्टात आला आहे. त्यानंतर राम मंदिर उभारले जात आहे. राम मंदिरासाठी देशभरातून निधी जमा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. अयोध्येत श्रीरामांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जगातील सर्वांत उंच मूर्ती साकारण्यात येणार आहे.
जगातील सर्वांत उंच मूर्ती साकारणार आहेत ते मराठमोळे अनिल राम सुतार. सध्या ते सोलापूर दौऱ्यावर आहेत. प्रभू श्रीरामांची ही मूर्ती जगातील सर्वांत उंच 251 मीटरची असणार आहे. 820 फूट इतकी तिची उंची असणार आहे. या मूर्तीचा चबुतरा 51 मीटर उंचीचा असेल आणि त्यावर श्रीरामांच्या 200 मीटर उंचीची मूर्ती असणार आहे. ही मूर्ती कांस्य धातूची असणार आहे, अशी माहिती अनिल राम सुतार यांनी दिली.
5 ऑगस्टला झाली पायाभरणी
अयोध्या येथे राम मंदिराची निर्मिती केली जात आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी कोट्यवधींचा निधी लागणार आहे. त्यामुळे या मंदिराचे निर्माण लोकसहभागातून केले जात आहे. त्यानुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून याकरता निधी गोळा केला जात आहे. या मंदिराची पायाभरणी 5 ऑगस्ट, 2020 मध्ये करण्यात आली आहे.
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’पेक्षा उंच
श्रीरामांची ही मूर्ती गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’पेक्षाही उंच असणार आहे. अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर सुमारे 125 ते 130 एकर परिसरात ही मूर्ती साकारण्यात येणार आहे. या परिसरात लेझर शोदेखील असणार आहे. याशिवाय पर्यटकांना पूजेसाठी आणि आध्यात्मिक अनुभूतीसाठी श्रीरामांचे मंदिर, ऑडिटोरियम, लायब्ररी, रामायणाची शिल्पाकृती, थिएटर, म्युझियम समावेश असणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुमारे साडेतीन ते चार वर्षे लागणार आहेत.
2 ते 3 हजार कारागीर करणार काम
श्रीरामांची मूर्ती भव्य असल्याने या मूर्तीच्या निर्मितीसाठी तब्बल 2000 ते 3000 कारागीर आणि कामगार काम करणार आहेत. यातील सर्व कारागीर हे भारतीय असणार आहेत. या मूर्तीचे संपूर्ण काम भारतातच होणार आहे.