कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – वाढदिवसानिमित्त मित्र मैत्रिणीसमवेत गावातील डोंगरावर फिरायला गेलेल्या तरुणीचा मंदिरातील घंटेला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन मृत्यु झाल्याचे प्रकाराने खळबळ उडली आहे. राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे ते दुर्गमानवाड रस्त्यावरील गजानन महाराज मंदिरात हा प्रकार रविवारी दुपारी उघडकीस आला. कौसर नाशिर नायकवडी (वय १७, रा़ कसबा तारळे) असे या तरुणीचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी, कौसर नायकवडी ही गावातील कॉलेजमध्ये अकरावीमध्ये शिकत होती. आई, तीन बहिणी, एक भाऊ व आजोबा यांच्यासोबत ती राहत होती. तिच्या वडिलांचे ६ वर्षापूर्वी निधन झाले आहे. रविवारी कौसरचा वाढदिवस असल्याने ती गावातील तिची एक मैत्रिण व चार मित्र असे सहा जण डोंगर परिसरातील घाटी येथील गजानन महाराज मंदिरात गेले होते. दुपारी गावातील काही महिला शेताकडून मंदिरात दर्शनासाठी आल्यावर त्यांना मंदिरातील घंटेच्या हुकाला कौसरचा मृतदेह ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी कुटुंबियांना माहिती दिली़ हे समजताच ग्रामस्थांनी मंदिराकडे धाव घेतली.
पोलिसांनी या मृतदेह शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवून दिला. कौसर मित्रमैत्रिणींबरोबर या ठिकाणी आली होती. तिचा घातपात केल्याचा संशय तिच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. तिच्या मित्रमैत्रिणीकडे पोलीस चौकशी करीत आहे. कौसरच्या गळ्यावर ओरखडे दिसल्याने, झटापट झाल्याची शक्यता असल्याने ही आत्महत्या आहे की, घातपात याविषयी संशय आहे. कौसरचा गळफासाने मृत्यु झाल्याचे शवविच्छेदच्या प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. मृतदेहाचा व्हिसेरा राखून ठेवला आहे. याप्रकरणी तीन तरुणींसह ७ जणांना ताब्यात घेतले असून ही आत्महत्या आहे की कोणी तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले याचा तपास सुरु असल्याचे पोलीस अधीक्षक देशमुख यांनी सांगितले.
Visit : bahujannama.com