औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – मराठा क्रांती मोर्चा सरकारच्या विरोधात पुन्हा राज्यभर उठाव करणार असून सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी विरोधात प्रचार करणार आहे. औरंगाबादेत ५ मार्च रोजी राज्यस्तरीय बैठक आयोजित केली असून बैठकीत पुढील दिशा ठरवली जाईल, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे प्रा. चंद्रकांत भराड, डॉ. शिवानंद भानुसे, सुरेश वाकडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. तत्पूर्वी झालेल्या बैठकीत सर्वानुमते सरकारच्या खोटारडेपणाचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. सकल मराठा समाजाच्या आंदोलनांची दखल घेऊन सरकारने मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेतला होता. एवढेच नव्हे तर नोकर भरतीत आरक्षण लागू करण्याबाबतदेखील पाऊल उचलले होते. या निर्णयाचे सर्व स्तरांवरून स्वागत झाले होते. मात्र मराठा आरक्षणाविरुद्ध उच्च न्यायालयात दाखल याचिकेचा निकाल लागेपर्यंत नियुक्ती आदेश न देण्याची सूचना महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभागांना केली आहे. या आदेशामुळे सरकारी नोकर भरतीत मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही हे स्पष्ट झाल्याने सुशिक्षित बेरोजगार तरुण, सकल मराठा समाज संतप्त झाला आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाची गुलाब विश्व हॉलमध्ये तातडीची बैठक घेण्यात आली.
यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीप्रमाणेच शिवसेना- भाजपला जमिनीवर आणण्यासाठी रणशिंग फुकण्याचा निर्णय घेतला. काही सामाजिक, राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मते मांडली. त्यातून सरकारविरोधातील रोष स्पष्टपणे समोर आला. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर ५ मार्च रोजी औरंगाबादेत राज्यस्तरीय बैठक घेऊन पुढील रणनीती निश्चित करण्यावर सर्वांनी शिक्कामोर्तब केले. यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना प्रा. भराड व डॉ. भानुसे म्हणाले की, सुमारे १९ हजार मराठा तरुणांवर गुन्हे दाखल आहेत. ते मागे घेणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते. प्रत्यक्षात कृती काहीच झाली नाही. सरकारी नोकरीत आरक्षणाचा लाभ देण्याबाबत निर्णय घेतला. आता त्यांचा सर्व खोटेपणा उघडा पडला आहे. ४२ मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या कुटुंबीयांना दहा-दहा लाखांची मदत देण्याचा निर्णय हवेत विरला आहे. असे एक नव्हे २० मागण्यांपैकी एकही मागणी पूर्ण झालेली नाही.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून आर्थिक मदत, वसतिगृह सर्वच्या सर्व प्रश्न जाणूनबुजून प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. सरकार एक दिवसात सर्व गुन्हे मागे घेऊ शकत होते. आजही ते घेऊ शकतात. पण इच्छाशक्ती नाही व तसे करायचेदेखील नाही. ही भूमिका आता स्पष्ट झाल्याने सत्ताधाऱ्यांचा माज उतरवण्यासाठी सकल मराठा समाज पुन्हा एकसंघ होणार आहे. यावेळी सुरेश पाटील, रमेश गायकवाड, सतीश वेताळ, मनोज गायके, धनंजय पाटील, अशोक मोरे, आत्माराम शिंदे, विकी राजे पाटील, अंकत चव्हाण, जी. के. गाडेकर, सुवर्ण मोहिते, रेखा वाहटुळे, प्रदीप हरदे, योगेश औताडे, तातेराव देवरे, मिलिंद साखळे, अमोल साळुंके, बाबासाहेब दाभाडे, प्रशांत इंगळे, सुभाष सूर्यवंशी, रवि तांगडे, वैभव बोडखे, रवि बोचरे, शिवाजी चव्हाण, शिवाजी जगताप आदींसह समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.