नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लग्नानंतर जबरदस्तीने पत्नीने आपल्यासोबत लव्ह जिहाद केल्याचा आरोप एका व्यक्तीने केला आहे. मोहित असे त्या व्यक्तीचे नाव असून, त्याने केलेल्या आरोपानुसार सासरच्या लोकांनी त्याचे जबरदस्तीने अबुजर अन्सारीत रूपांतर केले आहे. याबाबत पीडित व्यक्तीने दिल्लीतील प्रेमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहित नामक व्यक्तीने आपल्या पत्नीवर आरोप केला की, हिंदू मुलीच्या नावाने त्यांची सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर ओळख झाली. मग दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. तेव्हा मुलीने ती दुसऱ्या धर्माची असल्याचे म्हटले. मात्र, हिंदू म्हणूनच तुझ्यासोबत राहणार असे वचन मोहितला मुलीने दिले होते. त्यानंतर यूपीतील या मुलीने आपले धर्मपरिवर्तन करून २०१८ साली मोहितबरोबर आपला संसार थाटला.
मोहित आणि रेश्मा (नाव बदलेले आहे) यांना लग्नानंतर एक मुलगी झाली. मोहितने सांगितल्यानुसार, एक दिवशी त्याची पत्नी तिच्या माहेरी निघून गेली. ज्यावेळी मोहित आपल्या आईस घेऊन यूपीतील गोंडा या गावी गेले असता, पत्नीच्या कुटुंबातील काही व्यक्तींनी त्याला धमकी देत त्याचे धर्मांतर केले. त्याचे मोहित हे नाव बदलत अबुजर अन्सारी केले. तसेच त्यांनी मोहितकडून ८० हजार रुपयेही घेतले.
तदनंतर, दिल्लीला परत आल्यावर मोहितने लग्नाच्या साधारण २ वर्षांनंतर आपल्या पत्नीविरुद्ध दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली. त्याने केलेल्या आरोपानुसार, त्याची पत्नी सोनिया या नावाने फेसबुकवर त्याला भेटली आणि त्याची फसवणूक करण्यात आली. ज्यावेळी मोहित तिच्या प्रेमात पडला त्यानंतर तिने ती मुस्लिम असल्याचे सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी पत्नीच्या कुटुंबीयांनी २०१९ साली मोहित विरुद्ध हुंडा मागितला म्हणून गुन्हा नोंद केला होता. त्याच्याबरोबर एक वर्षानंतर मोहितीने दिल्ली पोलिसांत पत्नीवर लव्ह जिहाद आणि सक्तीने धर्मांतर केल्याचा आरोप केला आहे.
दिल्ली पोलिसांनी सांगितल्यानुसार, हे प्रकरण संवेदनशील असून, मोहितने केलेले आरोप खूप गंभीर स्वरूपाचे आहेत. त्याच अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केला असून, आमची टीम गोंडा येथे जाऊन या प्रकरणी चौकशी करेल. त्याचप्रमाणे कौटुंबिक वादातूनही याप्रकरणी चौकशी करण्यात येईल.