इंदापूर : पालखीच्या बंदोबस्ताला गेलेल्या पोलीस शिपायाच्याच घरी चोरट्यांनी हात साफ करुन घेतला. इंदापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसांच्या घरी चोरट्यांनी घरफोडी करुन तब्बल साडेतीन लाख रुपयांचे सोन्या, चांदीचे दागिने, रोकड चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरांची पोलिसांच्या घरी चोरी करण्याची हिंमत पाहून इंदापूर तालुक्यामध्ये चर्चेला उधाण आले आहे.
इंदापूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन पांडुरंग नरळे (वय २८ रा. अंबिकानगर, अंबिका आपार्टमेट, इंदापूर) हे पत्नी च्या गावी पर्यती ता.माण जि.सातारा याठिकाणी सुट्टीसाठी गेले आहेत.
नरळे हे २८ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून पासून संत तुकाराम महाराज पालखी बंदोबस्त ड्युटीस गेले होते.त्याचाच फायदा घेत चोरट्यांनी चोरी केली आहे.दि. १ जुलै रोजी सायंकाळी ७. ३० त्यांच्या अपार्टमेंट मधील डॉ. माने यांनी मोबाईलवरुन नरळे यांना कळविले की तुमचे घराचे दार उघडे आहे. त्यावेळी नरळे उंडवडी सुपे येथून पालखी बंदोबस्त करुन त्वरित इंदापुर येथे आले. घराचे दार उघडे दिसले म्हणुन त्यांनी घरात जावुन पाहीले असता घरातील लोखंडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले.
कपाटाची बारकाईने तपासणी केली असता, त्यांनी घरात ठेवलेले कपाटातील सहा तोळे वजनाचे दोन सोन्याचे गंठण, दोन तोळे एक ग्रॅम वजनाचे बदाम असलेले दोन सोन्याच्या चैन, लहान मोठ्या सहा अंगठ्या, दोन बदाम, सोन्याचा नेकलेस, सोन्याचे कानातील टाँप्सचे दोन नग, प्रत्येकी ११ मलदार सोन्याचे मणी असलेले लहान बाळाच्या दोन मनगट्या, सोन्याचे सुट्टे मणी, दोन सोन्याचे नथ, चांदीचे दागिने त्यामध्ये ब्रेसलेट, चांदीची वाटी, चमचा, चांदीचा करगोटा, मनगटी दोन, जोडवी व ९ हजार ५०० रुपये रोख रक्कम असा एकुण ३ लाख ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. नरळे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.