सांगली : बहुजननामा ऑनलाइन – ‘धुरमुक्त महाराष्ट्र’ या सकल्पनेच्या माध्यमातून आता ज्यांच्या घरी गॅस कनेक्शन नाही अशां शिधापत्रिकाधारकांना केवळ १०० रुपयांत गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे, अशी माहिती सांगली जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली.
राज्यामध्ये अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून पंडीत दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या ‘धुरमुक्त महाराष्ट्र’ या संकल्पनेच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येत आहे. यासाठी १५ जुलै ते १५ ऑगस्ट हा कालावधी नेमून देण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये एचपी, बीपी, आयओसी या कंपन्याच्या ७८ एजन्सी आहेत. ६ लाख ४७ हजार ८६५ गॅस कनेक्शन देण्यात आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून १ लाख ३ हजार ७८१ तर रेग्यूलर ५ लाख ४३ हजार ८६५ इतके कनेक्शन देण्यात आली आहेत. केरोसिन पात्र शिधापत्रिकाधारकांना एकूण २६४ लीटर केरोसिनचा पुरवठा केला जातो.
गॅस कनेस्शन कसे मिळवाल…
धुरमुक्त महाराष्ट्र यासंकल्पनेनुसार ज्या कुटुंबाकडे गॅस कनेक्शन नाही अशा कुटुंबाला गॅस कनेक्शन देण्यात येणार. यासाठी कुटुंबातील महिलेने पंतप्रधान उज्ज्वला योजना विस्तारीत दोन मधून केवायसी फॉर्ममध्ये १४ निकषांवर आधारीत हमीपत्र द्यायचे आहे. यासाठी रेशनकार्ड झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्सच्या दोन प्रती, दोन फोटो, बँक पासबुक झेरॉक्स जवळच्या गॅस एजन्सीकडे किंवी केरोसीन दुकानदाराकडे द्यावीत.
हमीपत्र कोठे मिळेल…
कुटुंबातील महिलेने हमीपत्रासोबत दिलेल्या कागदपत्रांची छाननी केली जाणार आहे. छाननी केल्यानंतर त्या कुटुंबाला १०० रुपयांत गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे. केवायसी आणि हमीपत्र सर्व गॅस एजन्सी आणि केरोसीन दुकानदारांकडे उपलब्ध असणार आहेत. जे केरोसिन घेत असणारे शिधापत्रिकाधारक हमीपत्र भरून देणार नाहीत त्यांच्याकडे यापूर्वीच गॅस कनेक्शन आहे असे समजले जाणार आहे.