बहुजननामा ऑनलाइन टीम – बहुप्रतीक्षित बेळगाव ते नाशिक विमानसेवा सोमवारपासून (दि. 25) सुरु झाली आहे. ही विमानसेवा रीजनल कनेक्टिव्हिटी स्कीम उड़े देश का आम नागरिक’ (UDAN) या योजनेअंतर्गत सुरू केली ( flight from Belgaum to Nashik)आहे. आठवडयातील तीन दिवस ही विमानसेवा सुरु राहणार आहे. यामुळे बेळगाववरून नाशिकसह 10 ठिकाणांसाठी एअर कनेक्टिव्हिटी असणार आहे. कर्नाटकमधील बेंगळुरू आणि मंगळुरूनंतर आता बेळगाव हे सर्वात व्यस्त एअरपोर्ट आहे. याआधी बेळगाव ते नाशिक दरम्यान एकही थेट फ्लाइट नव्हती. उडान योजनेअंतर्गत आतापर्यंत 311 मार्गांवर विमान सेवा दिली जात आहे.
स्टार एअरला या दोन्ही शहरांदरम्यान हवाई सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. विमानप्रवास भाडे स्वस्त आणि सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणारी विमानसेवा हा उद्देश ठेवून एअरलाइनला वायबिलिटी गॅप फंडिंग देखील उपलब्ध करून दिला आहे. स्टार एअरचे 50 सीट्सचे ERJ-145 हे विमान आठवड्यातील तीन दिवस उड्डाण घेणार आहे. सोमवार, शुक्रवार आणि रविवार या तीन दिवशी या विमानसेवेचा लाभ सामान्यांना घेता येणार आहे. बेळगावमधून फ्लाइट संध्याकाळी 4.40 वाजता उड्डाण घेईल ती नाशिकमध्ये 5.40 ला पोहोचेल. नाशिकमधून संध्याकाळी 6.15 ला विमान उड्डाण घेईल ते बेळगावमध्ये 7.15 ला पोहचणार आहे.
विमानसेवेचे नाशिकला होणार हे फायदे
राज्यातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून नाशिकची ओळख. देशात होणाऱ्या 4 कुंभमेळ्यापैकी एक नाशिकमध्येच होतो. शिवाय शिर्डी, त्र्यंबकेश्वरकडे जाण्यासाठी नाशिक हे शहर गेटवे आहे. लाखो भाविक आणि पर्यटक दरवर्षी नाशिकमध्ये येतात. शिवाय नाशिकची ओळख भारताची द्राक्ष आणि वाइनची राजधानी म्हणून देखील आहे. त्यामुळे एका तासात बेळगावातून प्रवास होत असेल, तर निश्चितच लोकांची ये-जा वाढणार आहे. परिणामी नाशिकमधील व्यवसायाचा फायदा दोन्ही शहरांना होणार आहे.