मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच चोपदारपदी नियुक्ती झालेल्या अनिता आत्माराम मोरे या आपल्या 36 वर्षांच्या अविरत सेवेनंतर बुधवारी (दि. 31) निवृत्त झाल्या आहेत. पतीच्या निधनानंतर अनिता यांना अनुकंपा तत्वावर न्यायालयात नोकरी मिळाली होती. मात्र त्यांना लिहता- वाचता येत नसल्याने आणि उच्च न्यायालयातील सगळी कागदपत्रे इंग्रजी भाषेत असल्याने न्यायमूर्तीकडे स्वाक्षऱ्यांसाठी कागदपत्रे नेताना सुरुवातीला गोंधळ उडायचा. मात्र न्यायमूर्तीनीही आपली ही बाजू समजून घेत आपल्याला घेतल्याचे त्या म्हणाल्या. लिहता -वाचता येत नसले तरी नोकरी करून मुलाला वकील बनवल्याचे अऩिता अभिमानाने सांगतात.
उच्च न्यायालयात शिपाई असलेले पती आत्माराम मोरे यांचे 1982 मध्ये अपघाती निधन झाल्याने अनिता यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. पदरात दोन मुलांसह आयुष्य कसे घालवायचे हा विचार त्यांच्या मनात डोकावला. अशातच अनिता यांना न्यायालयात अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली. मात्र एक मूल 6 महिन्यांचे असल्याने त्यांना नोकरी करण्यास सासरच्या मंडळींनी विरोध केला. सासरच्या मंडळींचा विरोध पत्करून 1985 मध्ये अनिता उच्च न्यायालयात रुजू झाल्या. दोन्ही मुले गावी आई-वडिलांकडे ठेवले. पुढे मुले मोठी झाल्यावर त्यांनी दोन्ही मुलांना मुंबईत आणून त्यांचे शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला अनिता या शिपाई म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना चोपदारपदी बढती मिळाली. न्यायमूर्ती के. के बाम, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले, न्यायमूर्ती रोशन दळवी, न्यायमूर्ती नितिशा म्हात्रे, विद्यमान न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्याजवळ चोपदार म्हणून काम केले. न्यायमूर्ती के. के. बाम यांनी आपल्या मुलाला शिकविण्यास मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य केल्याचे अनिता आवर्जून सांगितले. त्यांच्या निवृत्तीच्या दोन दिवस आधीच न्यायमूर्ती बाम यांचे निधन झाले. बाम यांच्यामुळेच आपला मुलगा वकील झाल्याचे अनिताने सांगितले.