न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले असून तिथे पूर्णपणे लॉकडाऊन केले नसले तरी मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्याचंही लोक पालन करत नसल्याचं दिसून येत आहे. मिशिगनमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून मुलीला मास्क घालायला का सांगितला म्हणून रागाच्या भरात वडिलाने सेक्युरेटी गार्डलाच गोळ्या घालून ठार केले आहे.
कॅलव्हीन म्युनरेलन हा सेक्युरेटी गार्ड हा एका सुपर मार्केटमध्ये ड्युटी करत होता. त्यावेळी एक कुटुंब खरेदीसाठी आले होते. मात्र त्यातल्या एका मुलीच्या चेहेर्यावर मास्क घातलेला नव्हता. त्यामुळे कॅलव्हीनने त्या मुलीला मास्क घालण्याची सूचना केली. तिने मास्क घातला नाही. त्यामुळे या मुलीचे बील काही करू नका असे त्याने तिथल्या कर्मचार्यांना सांगितले.
त्यानंतर ती मुलगी कारमध्ये निघून गेली. त्यानंतर ती कार पुन्हा त्या स्टोअर्समध्ये आली. त्यावेळी त्यांच्यासोबत काही जण होते. त्यातल्या एकाने रागाच्या भरात कॅलव्हीनवर गोळीबार केला. त्यात तो गंभीर जखमी झाला आणि हॉस्पिटलमध्येच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी त्या कुटुंबातल्या पाच जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.