बहुजननामा ऑनलाइन टीम – भारतीय औषध महानियंत्रक संस्थेने (DCGI) भारतात कोविशिल्ड लशीला आपत्कालीन मंजुरी मिळणे सर्वांसाठीच सुखावह बाब आहे. ऑक्सफर्डच्या या लशीची जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी( corona vaccine) व अनेक लोकांवर चाचणी करण्यात आली आहे, वेगवेगळ्या नियंत्रकांनी तिचे मूल्यांकन केले असून, तिची सुरक्षितता व परिणामकारता (इफिकसी) तपासली आहे. संपूर्ण भारताला ही लस मिळणार ही अतिशय आनंदाची गोष्ट असून यासाठी ‘सीरम’च्या परिवाराने घेतलेली मेहनत खूप मोठी आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोकांचे प्राण वाचतील असे सीरम इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक डॉ उमेश शाळीग्राम यांनी म्हंटल आहे.
डॉ शाळीग्राम म्हणाले, कोरोनामुळे संपूर्ण देश एकत्र आला व पंतप्रधान मोठी यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या यंत्रणांनी एकमेकांत खूप चांगला समन्वय ठेवला. यामध्ये नियंत्रक, जैवतंत्रज्ञान विभाग, आयसीएमआर या सर्व यंत्रणांनी परिणामकारकपणे व वेगाने लशीसंदर्भातील सर्व गोष्टींचे मूल्यांकन केल्यामुळे सर्वांत लवकर व त्याचबरोबर प्रत्येक पायरी व्यवस्थित तपासून ही लस बाजारात येत आहे.
या लसीच्या चाचण्या ब्रिटन, ब्राझील, दक्षिण आफ्रिका येथील एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांना तसेच अमेरिका व जपानमधील लोकांवर मोठ्या प्रमाणावर केल्या. त्यांच्या सुरक्षिततेचा व परिणामकारकतेचा डेटा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याला विविध देशांच्या रेग्युलेटर्स, इन्स्टिट्यूशनल इथिकल कमिटी, डेटा सेफ्टी मॉनिटरिंग बोर्ड यांनी मान्यता दिली असून हि लस सुरक्षित आहे. २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानाला ही लस साठवता येत असल्याने ती लोकांना देणेही खूप सोपे आहे. असेही त्यांनी सांगितले.
‘सीरम’कडे ७.५ कोटी डोस तयार
कोविशील्डमुळे कोरोनाचे संकट कमी होण्यास मदत होणार आहे. यामध्ये ‘सीरम’ची दूरदृष्टी असलेली टीम व विशेषतः सायरस व आदर पूनावाला यांच्या प्रयत्नांचा खूप मोठा वाटा आहे. पूनावाला यांनी जोखीम पत्करली व कोविशिल्ड हे तिचेच फळ आहे. ही लस आता भारतीयांसह अनेक देशांना अत्यंत कमी किमतीत मिळणार आहे, याचा ‘सीरम’ परिवाराला आनंद आहे. सध्या ‘सीरम’कडे ७.५ कोटी डोस तयार असून, या आठवडाभरात दहा कोटी डोस उपलब्ध होतील.सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जगात कोणात्याही देशाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात डोस उपलब्ध नाहीत व वेगाने केलेली ही लसनिर्मिती जगासाठी आदर्श उदाहरण ठरणार असल्याचेही डॉ उमेश शाळीग्राम यांनी सांगितले.