सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – महापालिका मासिक सर्वसाधारण सभेत अस्थिविहार प्रेरणाभूमीत झालेल्या भीमगीत कार्यक्रम खर्चाला मंजुरी देण्याच्या विषयावरुन गदारोळ झाला. हा विषय चर्चेत आल्यानंतर सभागृह नेते संजय कोळी यांनी विरोध दर्शविला.
दुसरीकडे बसपा गटनेते आनंद चंदनशिवे यांनी या वादात पालकमंत्री देशमुख यांना ओढले. पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच सभागृह नेते आपल्या प्रत्येक विषयाला विरोध करतात, असा थेट आरोप केला. या वादात उडी घेत काँग्रेस, एमआयएम, बसपा आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी प्रचंड घोषणाबाजी सुरु केली. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे दिसताच महापौर शोभा बनशेट्टी यांनी केल्याची घोषणा केली.
महानगरपालिकेची मासिक सर्वसाधारण सभा महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमहापौर शशिकला बत्तुल, आयुक्त डॉ. दीपक तावरे, नगरसचिव प्रवीण दंतकाळे उपस्थित होते . महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाणदिनानिमित्त अस्थिविहार प्रेरणाभूमी येथे झालेल्या समाजप्रबोधन व भीमगीतांच्या कार्यक्रमास झालेल्या १ लाख १५ हजार रुपये खर्चास मंजूरी देण्याचा विषय महिला व बालकल्याण समितीकडून सभापटलावर आला होता. या विषयावर सभागृहनेते संजय कोळी यांनी या कार्यक्रमाला मान्यता नसल्याचे सांगत हा विषय नामंजूर करावा अशी सूचना मांडली. तर विरोधी पक्षाकडून शिवसेनेचे राजकुमार हंचाटे यांनी मंजुरीची उपसूचना मांडली.
सत्ताधाऱ्यांकडून हा विषय नामंजूर करण्याची सूचना आल्याने नगरसेवक आनंद चंदनशिवे हे संतप्त झाले. गेल्या आठ वर्षांपासून दरवर्षी असा कार्यक्रम घेतला जातो, त्यास एकमताने मंजुरी दिली जाते, मात्र यंदा हा विषय नामंजूर कसे काय करता? असा सवाल करीत चंदनशिवे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करीत विषयाला मंजुरी देण्याचा आग्रह धरला. यावरुन सभागृहा मोठा गोंधळ सुरु झाला. सत्ताधारी सदस्य श्रीनिवास करली आदींनी सूचनेचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. या विषयावरुन सर्वच विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यास सुरुवात केली. याच गोंधळात आक्रमक बनलेल्या चंदनशिवे यांनी सभागृहनेते कोळी यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र काही सदस्यांनी त्यांना रोखले. गोंधळ थांबत नसल्याने अखेर महापौरांना सभा तहकूब करावी लागली.