बहुजननामा ऑनलाइन टीम – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमानानं प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारनं नाकारल्यानंतर आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. भाजप आता राज्य सरकारवर टीका करत आहे. अशात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत विचारलं असता त्यांनी या घटनेबाबत कोणतीही माहिती आपल्यापर्यंत आलेली नाही असं सांगितलं आहे.
अजित पवार म्हणाले, मला या घटनेबद्दल कोणतीही माहिती नाही. मी आता इथून मंत्रालयात जाणार आहे. तिथं गेल्यावर याबाबतची माहिती घेईन त्यानंतर बोलेन असंही त्यांनी स्पष्ट केलं. ते मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांना याबाबत विचारण्यात आलं होतं.
पुढं बोलताना अजित पवार म्हणाले, राज्याच्या राज्यापालांशी निगडीत घटनेवर राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून बोलत असताना संपूर्ण माहिती घेऊन बोलणंच योग्य आहे. ज्या घटनेबाबत मला कोणतीही माहिती नाही त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही. मंत्रालयात गेल्यावर याबाबत माहिती घेईन असंही ते म्हणाले.
नेकमं प्रकरण काय ?
राज्यपाल भगत सिंग कोश्यारी नियोजित दौऱ्यानुसार आज उत्तराखंडसाठी रवाना होणार होते. परंतु सरकारी विमानात बसल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप त्यांच्या विमान प्रवासाला परवानगी देण्यात आलेली नाही असं कळालं. त्यामुळं त्यांना विमानातून खाली उतरावं लागलं आणि पुन्हा राजभवनात परतावं लागलं अशी माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर आता भाजपकडून राज्य सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे.