बहुजननामा ऑनलाईन – सध्या लक्ष्मण माने शिवसेनेसोबत जाण्यासाठी इच्छुक आहेत, वंचित बहुजन आघाडीचा भाजपला फायदा होत असल्याचा आरोप करत ते बाहेर पडले. त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांना आमचे गुरु म्हणत शिवसेनेसोबत जाण्याची इच्छा त्यांनी सोलापुरात व्यक्त केली. महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी “प्रबोधनकारांच्या पोराने चूक केली, मात्र नातवंड सुधारत असतील तर मातोश्रीवर दिसायला वावडं वाटणार नाही”, असे विधान केले आहे. आमचा हा लढा भाजप विरोधात आहे आणि भाजप व शिवसेना हे वेगवेगळे पक्ष आहेत म्हणून एकवेळ आम्ही शिवसेनेसोबत बोलणी करू असे मतही लक्ष्मण माने यांनी व्यक्त केले.
यावेळी संघ आणि भाजपवर माने यांनी निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले,” आमचा लढा हा भाजप विरोधात आहे. आमचा ध्येय केवळ भाजप भगाओ आहे. आरएसएस ही भाजपच्या मागे आहे, ही अतिरेक्यांची संघटना आहे “, अशी जोरदार टीका लक्ष्मण माने यांनी केली.
देशाची आर्थिक स्थिती ही दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. रुपयाचे मूल्य घसरत आहे. याचा परिणाम देशातील उद्योगांवर दिसत आहे. म्हणूनच देशातील उद्योगात घट होत आहे. या बाबी असे असतानाही भाजपा सरकारमधील नेते देश सुव्यवस्थेत चालतो असे बोलत आहेत. अशा पद्धतीचे सरकार जर वेळीच खाली खेचले नाही तर देशाचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही. लोकांनी लोकशाही वाचविण्यासाठी येणाऱ्या विधानसभेत प्रयत्न करावे, असे आवाहनही यावेळी लक्ष्मण माने यांनी केले.