रायगड : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेनेने जळगावमध्ये भाजपच्या नगरसेवकांना पक्षात प्रवेश देऊन धक्का दिला. त्यानंतर काल मुक्ताई नगरपालिकेच्या 10 आजी-माजी नगरसेवकांना प्रवेश देऊन दुसरा धक्का दिला. यानंतर आता भाजपने याचा बदला माथेरानमध्ये घेतला आहे. भाजपने माथेरान नगरापालिकेतील 10 नगरसेवकांना पक्षात प्रवेश दिला आहे. त्यामुळे राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
माथेरान नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्यासह 10 नगरसेवकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला. माथेरान नगरपालिकेत एकूण 14 नगरसेवक असून 14 नगरसेवक शिवसेनेचे आहेत. त्यापैकी 10 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूरात हा प्रवेश सोहळा पार पडला. दहा नगरसेवकांना भाजपमध्ये आणण्यात भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांची महत्त्वाची भूमिका आहे. ठाकूर यांची कार्यशैली व नेतृत्व भावल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केल्याचं या नगरसेवकांचे म्हणणे आहे.
भाजपाच्या विकासाच्या धोरणावर विश्वास ठेवत माथेरान नगरपरिषदेतील १४ पैकी १० नगरसेवकांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व नगरसेवकांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ! @JPNadda @dev_fadnavis pic.twitter.com/p30U5aGIjQ
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 27, 2021
शिवसेनेच्या 14 पैकी 10 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने माथेरान नगरपालिकेत भाजपला बहुमत मिळाले आहे. भाजपमध्ये प्रवेश कलेल्या नगरसेवकांमध्ये उपनगराध्य आणि आरोग्य समिती सभापती आकाश चौधरी, राकेश चौधरी, सोनम दाभेकर, प्रतिमा घावरे, रुपाली आखाडे, सुषमा जाधव, प्रियांका कदम, ज्योती सोनावळे, संदीप कदम, चंद्रकांत जाधव यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला.