हैद्राबाद बहुजननामा ऑनलाइन : आंध्र प्रदेशमधील गुंटूर जिल्ह्यातील अनंथवरम या गावातून एक संतापजनक प्रकार घडला आहे. दलित असल्याच्या कारणावरून वुंदावली श्रीदेवी या महिला आमदाराला गणेश मंडपात प्रवेश नाकारल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. वुंदावली श्रीदेवी या वायएसआर काँग्रेसच्या महिला आमदार आहेत.
गणपती आगमनानिमित्त श्रीदेवी या अंनथवरम येथील गणपतीच्या दर्शनासाठी गेल्या असताना त्या मागास जातीतील असल्याने त्यांना गणेश मंडपात प्रवेश नाकारण्यात आला. “त्या मागास जातीतील आहे. त्यांनी गणेश पूजेत सहभाग घेतला तर गणेश अपवित्र होईल”, असे सांगत टीडीपीच्या (तेलगू देसम पार्टी) स्थानिक नेत्यांनी श्रीदेवी यांना गणेश मंडपात प्रवेश करण्यापासून रोखले. तरीही श्रीदेवी यांनी मंडपात जाण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे घटनास्थळी बराच वाद निर्माण होऊन मारामारी करण्यात आली . या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
टीडीपीच्या कार्यकर्त्यांनी गणेश मंडपात प्रवेश करण्यास विरोध केल्यानंतर आमदार वुंदावली श्रीदेवी यांना दर्शन न घेता परत जावे लागले. मात्र, त्यानंतर टीडीपी आणि वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये गदारोळ निर्माण झाला. दोन्ही पक्षातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले. वाद जास्तच पेटल्याने पोलिसांनी मध्यस्ती करत परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी श्रीदेवी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, वायएसआर काँग्रेसच्या नेत्यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त करत गावात निदर्शने केली आहेत.
#WATCH Guntur: TDP leaders stop YSRCP MLA Vundavalli Sridevi from entering a Ganesh Pandal in Ananthavaram village, allegedly because she belongs to Dalit community. #AndhraPradesh (02.09.19) pic.twitter.com/X0o1QYg9Px
— ANI (@ANI) September 3, 2019