पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव करण्याचे आमचे लक्ष्य आहे, अशी माहिती महसुलमंत्री व पुण्याचे पालकमत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. पुण्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर पाटील यांनी मंगळवारी पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या कार्यालयाला भेट दिली. विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, सभागृहनेते एकनाथ पवार आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, बारामती, भोर व इंदापूर मतदारसंघांत आम्ही कमी पडलो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा निसटता विजय झाला. २०२४ च्या निवडणुकीत सुळे यांच्या पराभवाचे उद्दिष्ट आहे. तसेच केवळ निवडणुकीपुरते बारामतीमध्ये येतात असे मतदारांना वाटू नये. यासाठी दर १५ दिवसाला बारामती मतदारसंघात जाणार आहे. लोकसभेतील सहाही विधानसभा मतदारसंघांत जोर लावणार आहे.
त्यापुर्वी आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पराभवाचे लक्ष्य असल्याची माहिती देखील पाटील यांनी दिली. लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांना ज्या प्रमाणे सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी बारामती मतदार संघात अडकुन पडावे लागले होते. त्याचप्रमाणे अजित पवार यांना बारामती मतदार संघातच अडकवून ठेवण्याचे चंद्रकांत पाटील यांचे उदिष्ट असल्यचे सांगितले जात आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यश पाहता बारामतीची विधानसभा निवडणुक अजित पवारांसाठी नक्कीच सोपी नसेल, असा अंदाज राजकीय विश्लेषक देखील व्यक्त करत आहेत. त्यामुळे युतीमध्ये अजित पवारांविरोधात कोणता उमेदवार निवडणुक लढवणार याची चर्चा अत्ताच सुरु झाली आहे.