किलिमंजारो : वृत्तसंस्था – तंजानियाच्या एका चर्चमध्ये चेंगराचेंगरी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेत 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक अधिकार्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथील किलिमंजारो डोंगर पायथ्याशी असलेल्या मोसी नावाच्या शहराजवळील स्टेडियममध्ये शेकडो लोक जमा झाले होते. यावेळी पवित्र तेलाने अभिषेक घेण्यासाठी लोकांनी ढकला-ढकली केली, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या घटनेतील मृतांची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.
वृत्त संस्थेच्या माहितीनुसार मोसी जिल्हा कमिश्नर किप्पी वारिओबा यांनी सांगितले की, घटनेत 20 लोकांचा मृत्यू झाला आणि 16 जण जखमी झाले आहेत. मृत व्यक्तींमध्ये 5 मुलांचा समावेश आहे.
वारिओबा म्हणाले, पवित्र तेल घेण्यासाठी जेव्हा लोक धावू लागले तेव्हा चेंगराचेंगरी झाली. अधिकार्यांचे म्हणणे आहे की, मृतांची संख्या आणखी वाढू शकते. ही घटना शनिवारी रात्री उशीरा झाली. प्रशासन सध्या घटनेचा आढावा घेत आहे. काही वर्षांपासून तंजानियामध्ये असे प्रकार समोर येत आहे की काही लोक जादूने गरीबी दूर करण्याचा दावा करत आहेत. तसेच येथील नागरिकसुद्धा अशा लोकांना भूलत आहेत.