बहुजननामा ऑनलाईन – तामिळनाडूमधील कांचीपुरम जिल्ह्यातील वरदराजा पेरुमल मंदिरात प्रशासकीय अधिकारी एका पोलीस अधिकाऱ्याला धमकावत असल्याचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहे. एक पोलीस अधिकारी मंदिरात आलेल्या भक्तांना व्हीआयपी गेटमधून आत सोडत होता. त्यामुळे आता तू संपलास अशी धमकी जिल्हाधिकाऱ्याने या पोलीस अधिकाऱ्याला दिली आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तुम्ही येथे फसवणूक करण्यासाठी येता ? तुम्ही इथे काय तपासणी करता ? मी तुम्हाला संपवून टाकेन. कारण इथून अनेकजण पास न घेता जात आहेत. जेव्हा इथे व्हीयआपी येतात, तेव्हा मुर्खासारखे उभे राहता. आता वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि नेते येत आहेत. तू आता संपलास. मी तुझ आजच निलंबन करतोय, अशी धमकी पोलीस अधिकाऱ्याला दिली व जिल्हाधिकारी पी पोन्निया पोलीस या अधिकाऱ्यावर संताप व्यक्त करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ २ मिनिटांचा आहे.
हा प्रकार झाल्यानंतर जिल्हाधिकारी एवढ्यावरच थांबले नाहीत तर राज्य पोलीस उद्धट असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली. ते म्हणाले की तुम्ही पोलीस कर्मचारी खूप उद्धट असता. तुमचे पोलीस महानिरीक्षक कुठे आहेत ? असंही ते म्हणाले. हा पोलीस अधिकारी मात्र वारंवार विनंती करत आपली बाजू सांगण्याचा प्रयत्न करत होता. पण या जिल्हाधिकाऱ्याने त्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडले.
याबाबत अधिक माहिती अशी की मंदिरात भक्तांना मोठ्या संख्येने व्हीआयपी गेटमधून प्रवेश दिला जात होता. त्यामुळे जिल्हाधिकारी नाराज झाले. मात्र पोलिसांनी सांगितल्यानुसार, व्हिडीओत दिसणारे पोलीस निरीक्षक रमेश यांनी फक्त एका वयस्कर दांपत्याला त्रास होऊ नये यासाठी तेथून जाण्याची परवानगी दिली होती. हे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. यावर या जिल्हाधिकाऱ्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की व्यवस्थित काम सुरु नसल्याने मला संताप आला असे त्यांनी सांगितले. तसेच पोलीस खातं किंवा एखाद्या अधिकाऱ्याविरोधात माझा अजिबात रोष नाही, असंही ते म्हणाले.