मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – जगभरात कोरोनाचा कहर वाढतच असून लॉकडाऊनमुळे घसरलेल्या अर्थव्यवस्थेचा परिणाम आता नोकर्यांवर दिसण्यास सुरुवात झाली आहे. ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. येत्या काही दिवसात देशभरातील 1 हजार 100 कर्मचार्यांची कपात करणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. कंपनीने ई-मेलद्वारे कपातीची माहिती कर्मचार्यांना दिली. त्याआधी स्विगीची प्रतिस्पर्धी कंपनी झोमॅटोने आपल्या 13 टक्के कर्मचार्यांच्या कपातीची घोषणा केली होती.
स्विगीचे सहसंस्थापक श्रीहर्ष माजेती यांनी फूड डिलिव्हरी व्यवसायावर खोल परिणाम झाला असून येत्या काही दिवसात हा परिणाम कायम राहिल. मात्र आगामी काळात हा व्यवसाय रुळावर येईल, अशी आशा आहे. परंतु आम्हाला आमच्या कंपनीतील कर्मचार्यांची संख्या कमी करण्याची आणि येत्या काळात कोणत्याही प्रकारच्या अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी कपातीची गरज असल्याचे सांगितले. कोरोनामुळे सर्वाधिक परिणाम कंपनीच्या क्लाऊड किचन बिझनेसवर झाल्याचे त्यांनी सांगितले. जे व्यवसाय पूर्णत: अस्थिर होण्याची शक्यता आहे किंवा पुढील 18 महिन्यांपर्यंत त्यांचा काहीच उपयोग नसेल, ते व्यवसाय आम्ही बंद करणार आहोत. असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्या कर्मचार्यांची कपात केली जाईल, त्यांना कमीत कमी तीन महिन्यांचा पगार, अॅक्सिलिरेटेड वेस्टिंग, डिसेंबरपर्यंत आरोग्य विमा आणि कंपनीत त्यांनी जेवढी वर्षे काम केलेले आहे, त्यात प्रत्येक वर्षासाठी एक महिन्याचे अतिरिक्त पगार दिला जाणार आहे.