पुणे (बहुजननामा ऑनलाइन) – सुषमा स्वराज यांचा विवाह 1975 मध्ये स्वराज कौशीक यांच्यासोबत झाला. सुषमा यांना एकच मुलगी असून तिचे नाव बासुंरी कौशीक आहे. ती आपल्या वडीलांप्रमाणे क्रिमीनल लॉयर आहे. बासुंरी यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी घेतली असून इनर टेम्पल येथे कायद्याचे शिक्षण घेतले आहे. सध्या त्या दिल्लीमध्ये उच्च व सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टीस करतात. ललित मोदी प्रकरणात त्यांचे नाव आल्याने त्या प्रसिद्धी झोतात आल्या होत्या. आयपीएलचे कमिशनर ललित मोदी यांच्या कायदेविषयक सल्लागार टीममध्ये बासुंरी यांचा समावेश होता.
त्यांच्या सोबत या टिममध्ये महमुद अब्दी, रोजर ग्रेसन,डॉ. आर मराठा, बियांका हेमरिच, व्येंकटेश दोंद, अभिषेक सिंह, अंकुर चावला यांचा समावेश होता. ललित मोदी यांना पासपोर्ट प्रकरणात न्यायालयातून दिलास मिळवून देण्याचे काम बासुंरी यांनी केले होते. त्यानंतर ललित मोदी इंग्लंडला पळून गेले. त्यावेळी माध्यमांमधून बासुंरी यांच्यावर टिका करण्यात आली होती. सुषमा स्वराज यांनी त्यावेळी बासुंरी यांच्या कामात हस्तक्षेप करण्यास नकार देवून बासुंरी या त्यांचे काम करण्यास स्वतंत्र आहेत, असे सांगितले होते.
सुषमा स्वराज यांचे पती देखील प्रसिद्ध वकील आहेत. त्यांना वयाच्या 34 व्या वर्षी देशातील सर्वात तरुण अॅडव्होकेट जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी मिझोरमचे राज्यपाल म्हणून देखील काम पाहिले आहे. 1990 ते 1993 या काळात ते मिझोरमचे राज्यपाल होते.