Supriya Sule On Ajit Pawar | अजित पवारांना काय सल्ला देणार? बारामती जिंकताच सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर

बारामती: Supriya Sule On Ajit Pawar | लोकसभेच्या तोंडावर राज्यात राष्ट्रवादी पक्षात फूट पडली. अजित पवार काही नेत्यांना घेऊन महायुतीत सहभागी झाले. बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha) नेमकं कोण बाजी मारणार याबाबत अनेकांना उत्सुकता होती. याठिकाणी सुप्रिया सुळे यांनी 1.5 लाखांहून अधिक मताधिक्याने विजय खेचून आणला.

या मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) निवडणुकीच्या रिंगणात होत्या. याठिकाणी महायुतीकडून जोरदार ताकद लावल्यात आली होती. अजित पवारांचे राजकीय शत्रू असणारे हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) आणि विजयबापू शिवतारे (Vijay Shivtare) यांनीही महायुती म्हणून आपली ताकद सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी लावली होती.

मात्र अजित पवार, हर्षवर्धन पाटील, विजयबापू शिवतारे यांच्या मतदारसंघातही सुप्रिया सुळे लीड वर असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान प्रचारावेळी अजित पवारांनी आपल्या स्टाईलमध्ये अनेकांवर टीका केली होती तर अनेकांना जाहीर सभेत दम ही भरला होता.

बारामती लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर अजित पवारांना काय सल्ला देणार असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर ‘मी एक सुसंस्कृत मराठी मुलगी आहे. आपल्यापेक्षा वयाने, कर्तृत्वाने आणि नात्याने जे मोठे असतात, त्यांना सल्ला द्यायचा नसतो, त्यांच्याकडून सल्ला घ्यायचा असतो’, असे उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले.

“इंडिया आघाडीचे (India Aghadi) सर्व सहकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा हा विजय आहे. या विजयाने जबाबदारी खूप वाढली आहे. उद्यापासून दुष्काळी दौरा सुरु करणार आहे. चारा छावणी, पाणी आणि दुष्काळासाठी कार्यकर्त्यांनी काम करावं, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.